|| महेश बोकडे

रुग्णांचे नमुने पाठवण्यात मदत करीत असल्याचा संशय:- मेडिकलमधील अनेक रुग्णांचे नमुने थेट वार्डातून खासगी प्रयोगशाळेत जात असल्याचे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (मसुब) जवानांनी केलेल्या कारवाईत पुढे आले होते. प्राथमिक चौकशीत काही प्रयोगशाळेच्या मालकांचे नातेवाईक मेडिकलच्या विविध विभागात कार्यरत असून त्यांची या कामात मदत होत असल्याची शंकाही उपस्थित करण्यात आली. परंतु कुणीही त्यावर काही बोलत नसल्याने या प्रकरणाची चौकशी होणार काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी काही दिवसांपूर्वी ट्रामा केयर सेंटरसह मेडिकलमध्ये खासगी  प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ रुग्णांचे नमुने थेट वार्डातून स्वत: घेत असताना पकडले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या निदर्शनावरून खासगीतील तंत्रज्ञांची मोठय़ा प्रमाणात धरपकड करण्यात आली. परिसरातील प्रयोगशाळेच्या मालकांचे नातेवाईक मेडिकलच्या विविध कार्यालयांत कायम आणि कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असल्याचेही जवानांच्या प्राथमिक पाहणीतून पुढे आले. परंतु कुणीही भीतीपोटी बोलायला तयार नाही.

मेडिकल, त्याच्याशी संलग्नित ट्रामा केयर सेंटर आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळा स्थापित करत वर्ग एक ते चार पर्यंतच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सगळ्यांवर वर्षांला कोटय़वधींचा खर्च होतो. येथील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी येथेच करण्याचा नियम असताना थेट वार्डातून रुग्णांचे नमुने घेऊन खासगी प्रयोगशाळेत पाठवले जातात.

‘‘मेडिकलमध्ये सर्वच तपासण्या केल्या जातात. परिसरातील खासगी प्रयोगशाळेच्या मालकांचे नातेवाईक मेडिकलच्या विभागात कार्यरत आहेत वा ते संबंधित प्रयोगशाळेत येथील रुग्णांचे नमुने पाठवण्यात मदत करत अशी तक्रार प्रशासनाकडे नाही. परंतु प्रकरणाचे गांभीर्य बघत चौकशी केली जाईल. त्यात काही अनुचित आढळल्यास नियमानुसार कारवाई होईल.’’– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.