29 March 2020

News Flash

परिसरात मुलभूत सुविधांचा अभाव

नवीन प्रभाग क्रमांक ३ मध्ये येणाऱ्या वस्त्यांमध्ये पाच वर्षांपूर्वी असलेल्या समस्या जशाच्या तशा आहेत.

वनदेवीनगरात बाराही महिने टँकर आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी. 

प्रभाग क्रमांक

साधारणत: हल्ली कोणत्याही वस्तीत जा रस्ते, पाणी, वीज, शाळा, दवाखाने, बगिचा, बालवाडी, शाळा इत्यादी मूलभूत सुविधा पहावयास मिळतात. पण, वनदेवीनगर, यशोधरानगर, वीटभट्टी, नागसेनवन, पिवळी नदीचा अनेक भाग खास करून वनदेवीनगरचा भाग मूलभूत सुविधांना पारखा आहे. रेल्वेच्या जागेवर १५ वर्षांपूर्वी ही वस्ती वसली आहे. या भागातील मतदानही नगरसेवकांना मिळते. मात्र, नगरसेवकांना लोकांपर्यंत प्राथमिक गरजा पुरवण्याची गरज भासत नसल्याची खंत प्रभाग क्रमांक तीनमध्ये येणाऱ्या वस्त्यांतील नागरिकांनी व्यक्त केली आहेत. भाजपच्या भाग्यश्री कानतोडे आणि शिवसेनेचे बंडू तळवेकर या भागाचे प्रतिनिधित्व करतात मात्र, त्यांच्याच भागातील समस्या दूर झालेल्या नाहीत तर ते इतरांच्या काय करणार, अशी तिखट प्रतिक्रिया त्या भागातील माजी नगरसेवक मनसूर खान यांनी दिली आहे.

म्हणजे त्या ठिकाणी वार्डात गडरलाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, शाळा, बालवाडी, दवाखाना, नाल्या, रस्ते तर नाहीच पण त्या भागातील नाल्यामुळे दरवर्षी शहराशी संबंध तुटतो आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात काम असेल तर अडचणी येतात. शिवाय सहज प्रवास शक्य नसतो. कारण स्थानिक बससेवा त्या भागापर्यंत पोहोचल्या नाहीत. दूर एक-दीड किलोमीटरवर असलेल्या नागसेन येथील बसस्थानकावर पायी जावे लागते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्यामुळे त्रास होतो. नवीन रचनेनुसार प्रभाग तीनची ६४,३७१ लोकसंख्या आहे. वांजरा औद्योगिक वसाहत, संघर्षनगर, पांडे वस्ती, महेबूबपुरा, शारदा इस्पात कंपनी, हमीदनगर, संगमनगर, वनदेवीनगर, धम्मानंदनगर, योगी अरविंदनगर, रमाई मातोश्री आंबेडकर नगर, भीमवाडी, विनोबा भावेनगर, राजीव गांधीनगर, संतोषनगर, संजयबाग कॉलनी, गरीब नवाजनगर, प्रवेशनगर, शिवशक्तीनगर, संजीवन कॉलनी, पवननगर, यशोधरानगर आणि विटाभट्टी एवढय़ा वस्त्या प्रभाग तीनमध्ये येतात. त्यातील विनोबा भावेनगर एनआयटीने विकसित केले आहे तर यशोधरानगर, योगी अरविंदनगर, संघर्षनगरात, नवाज शरीफनगर इत्यादी ठिकाणी बालवाडी, बससुविधा, गडरलाईन, पाईपलाईन, दवाखान्यांसारख्या प्राथमिक सुविधा आहेत. मात्र, काही भागात तर यापैकी काहीच सुविधा नाहीत. वनदेवीनगर, नागसेननगर, पिवळीनदीचा काही भाग फारच अभावग्रस्त आहे.

नवीन प्रभाग क्रमांक ३ मध्ये येणाऱ्या वस्त्यांमध्ये पाच वर्षांपूर्वी असलेल्या समस्या जशाच्या तशा आहेत. १९८२मध्ये चार इंचीची मलवाहिनी टाकली होती. आज लोकसंख्या वाढूनही तीच मलवाहिनी कायम आहे आणि अनेक ठिकाणी निकामी झालेली आहे. तिच्या जवळूनच पिण्याची पाईपलाईन गेली असल्याने दूषित पाणी प्यायल्याने कावीळ होऊन आतापर्यंत ६-७ लोक मरण पावले आहेत, तर शेकडोंना कावीळची लागण झाली आहे. या भागात शाळा, ग्रंथालय, बाजारहाट, दवाखान्यासाठी महापालिकेने जागा ठेवली नाही. शिवाय अंतर्गत रस्तेही बनलेले नाहीत. विद्यमान नगरसेवक जेथे राहतात तेथेच तर कामे झाली नाही तर बाकी ठिकाणी काय होणार?

मन्सूर खान, माजी नगरसेवक

नगरसेवक लक्ष देत नाहीत. कचऱ्याच्या गाडीसाठी आम्ही झोनमध्ये अर्ज केला आणि नगरसेवकालाही सांगितले, पण कचऱ्याची गाडी येतच नाही. बाराही महिने टँकर वस्तीत येत असते. गेली १४-१५ वर्षे तर रस्ता नव्हताच. मुरमाचा कच्चा रस्ता होता. याचवर्षी रस्ता बनला. नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत असते आणि शिवाय डुकरांचा उच्छाद पहावयास मिळतो.

नवीनकुमार सहारे, वनदेवीनगर

या प्रभागात अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यांचा अभाव आणि कचऱ्याचे साम्राज्य आहे. विजेची सोय नसल्याने लोक हूक टाकतात. सार्वजनिक शौचालय नसल्याने रस्त्याच्या कडेला बसतात. विटाभट्टींमुळे परिसरात सतत धूळ, खड्डेच असतात. पिवळी नदी नाल्याला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी प्रत्येक घरात शिरते. ओसीडब्ल्यूच्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून गटारीचे पाणी येते. नागपूर सुधार प्रन्यासने मालकी हक्काचे पट्टे नियमित केलेले नाहीत.

सतीश लोणारेपिवळी नदी परिसर

गेल्या साडेचार वर्षांत भरपूर कामे झाली असून संघर्ष नगरात ७० लाख, पांडे वस्तीत १५ लाख, योगी अरविंद नगरमध्ये ३० लाख, हमीदनगर ५० लाख, संगमनगरात ५० लाख अशी एकूण १७ कोटींच्या कामांपैकी काही झाले असून काही प्रगतिपथावर आहेत. हमीदनगरमध्ये काहीच नव्हते. त्याठिकाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी ५० लाखाची तरतूद आहे. संजीवनी कॉर्टरमध्येही बरीच कामे झाली. यशोधरानगरात हिंदी शाळेचे काम केले. काही ठिकाणी गढूळ पाणी होते, तेथे पाईप लाईनमुळे स्वच्छ पाणी देणे शक्य झाले. या भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचेच पालकमंत्री केवळ घोषणा देऊन जातात, पण करीत काहीच नाहीत. एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा गडकरींनी केली होती, पण एकालाही रोजगार मिळाला नाही. मी महापालिकेतील एकमेव नगरसेवक भाजपशी बिगर युतीत आहे. भाजपची युती मानत नाही.

बंडू तळवेकर, ज्येष्ठ विद्यमान नगरसेवक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2016 1:10 am

Web Title: lack of basic facilities in nagpur ward 3
Next Stories
1 संगणक शिक्षकांच्या मोर्चावर पाण्याचा मारा, लाठीमार
2 मेहनतीच्या जोरावर ‘कस्र्ड किंग’चे एक पाऊल पुढे!
3 वनकोठडी अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!
Just Now!
X