३५ परिवहन कार्यालयांत ‘ट्रॅक’ नाही; इतर जिल्ह्य़ातून तपासणीसाठी शेकडो कि.मी.चा फेरा

मुंबई उच्च न्यायालयाने अनेकवेळा मुदतवाढ देऊनही राज्यातील ५० पैकी ३५ परिवहन कार्यालयांत ‘ब्रेक तपासणी चाचणी ट्रॅक’चे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील व्यावसायिक वाहनांना तपासणीसाठी नागपूर ग्रामीणच्या परिवहन कार्यालयात यावे लागते. राज्यातील इतर २७ कार्यालयांतही हीच स्थिती आहे.

परिवहन विभागाची राज्यात ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. व्यावसायिक वाहनांची ब्रेक तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम परिवहन विभागाचे असते. त्यानुसार या विभागाने राज्यातील सर्व कार्यालयांत तपासणीसाठी २५० मीटरचे ट्रॅक तयार करायला हवे होते. त्याकरिता न्यायालयाने वारंवार परिवहन विभागाला मुदतवाढ दिली, परंतु सद्यस्थितीत राज्यातील ३५ कार्यालयांत अद्याप स्वतंत्र ट्रॅक नाहीत. त्यातच न्यायालयाने दिलेली मुदतही ३१ ऑक्टोबरला संपली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने ट्रॅक नसलेल्या जिल्ह्य़ातील वाहनांना ही सोय असलेल्या इतर जिल्ह्य़ांत तपासणीसाठी पाठवावे, असे आदेश जारी केले. त्यामुळे सुमारे दीडशे किलो मीटरवरील गडचिरोली, चंद्रपूरमधील वाहनांना तपासणीसाठी नागपूर ग्रामीण कार्यालय गाठावे लागते. या निर्णयामुळे  आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे मन:स्ताप सहन करणाऱ्या नागपूर ग्रामीणसह राज्यातील १५ कार्यालयांवर ताण वाढणार आहे.

नवीन आदेशानुसार गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर (पूर्व) आदी ठिकाणांवरील सर्व व्यावसायिक वाहने नोंदणीसाठी नागपूर (ग्रामीण) कार्यालयात, तर वाशीम जिल्ह्य़ातील वाहने बुलढाण्याला येत आहेत. पुणे, बारामती, कोल्हापूर, कराड आणि सांगली येथील वाहने पिंपरी-चिंचवड कार्यालयात न्यावी लागतात. या निर्णयाची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

‘‘सध्या ब्रेक तपासणी ट्रॅक काही जिल्ह्य़ांना दूर पडत असल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. चंद्रपूरमध्ये ही सोय लवकरच उपलब्ध होईल. इतर कार्यालयांतील कामेही काही दिवसांतच पूर्ण होतील.’’ – श्रीपाद वाडेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण)

येथे तपासणी होते

नागपूर (ग्रामीण), औरंगाबाद, नांदेड, अमरावती, मालेगाव, सोलापूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, कल्याण, नंदूरबार, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड, वर्धा येथे सोय नाही.

वसई, नवी मुंबई, पेण, पनवेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, जालना, अंबेजोगाई, अहमदनगर, श्रीरामपूर, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, वाशीम, परभणी, पुणे, बारामती, कोल्हापूर, कराड, सांगली, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर (पूर्व)

मुदतवाढीमुळे ९ जिल्ह्य़ांना दिलासा

न्यायालयाने ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे सांगली, गोंदिया, अकलुज, सातारा, ठाणे या ५ आरटीओ कार्यालयांच्या परिक्षेत्रातील वाहनांची ब्रेक तपासणी निश्चित कालावधीपर्यंत केलेल्या रस्त्यावर होत आहे, तर मुंबईतील ४, नागपूर (शहर) या कार्यालयांतील वाहनांच्याही तपासणीसाठी ३० एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.