विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुविधांचा अभाव; ना शौचालय, ना उन्हापासून संरक्षणाची सोय 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आंतरशालेय विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खेळाडूंसाठी कोणत्याच मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरू असून येथे खेळाडूंसाठी ना शैचालयाची व्यवस्था आहे ना कपडे बदलण्यासाठी ‘चेंजिग रुम’ आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी साधे छप्परही उभारण्यात आलेले नाही.

दोन दिवसांपासून नागपुरात आंतर शालेय विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत नागपूर विभागातून वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर अशा सहा जिल्ह्य़ातून जवळपास पाचशे मुले-मुली स्पर्धेतसाठी आले आहेत.  विशेष म्हणजे, स्पर्धेदरम्यान खेळाडूंना दुखापत होत असते त्यामुळे डॉक्टरांची चमू आणि रुग्णवाहिका स्पर्धेतच्या स्थाळी असणे आवश्यक आहे. मात्र ती सोय देखील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे केली गेलेली नाही.

स्पर्धेत १००,२००,४००,८००, १५००,३०००, ५००० मीटरची दौड स्पर्धा आणि तीन व पाच किमीची क्रॉसकंट्री स्पर्धा घेण्यात येते. खेळाडू धावून आल्यावर त्याला सावलीची नितांत आवश्यकता असून आयोजकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. प्रशिक्षकांना बसण्यास खुच्र्याची सोय नाही.  स्पर्धेत गोळाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडीसह अनेक स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेततील पंच आणि तांत्रिक जबाबदारी साभांळणाऱ्यांनाही केवळ दोन सामोसे आणि एका चहावर दिवस काढावा लागत आहे.