खासगी रुग्णालयांत ११०, येथे एकही रुग्ण कसा नाही?

उपराजधानीत यंदाच्या उन्हाळ्यात विविध खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या ११० रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु अद्याप प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकल, मेयोत एकही रुग्ण नोंदवला गेला नाही. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण खात्याकडे हे दोन्ही रुग्णालय माहिती देत नसल्याबाबत तक्रारच करण्यात आली असून या प्रकरामुळे मेडिकल, मेयो येथे उष्माघाताच्या रुग्णांची लपवा-छपवी सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

नागपुरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधून-मधून पाऊस व त्यापूर्वी तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यामुळे नागरिकांना उकाडय़ाचा चांगलाच मन:स्ताप झाला. त्यामुळे येथे हलक्या तापासह गॅस्ट्रो, अतिसार अशा आजारांचे रुग्ण शहरातील सगळ्याच भागात वाढले. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशन, डागा या शासकीय रुग्णालयातच गेल्या दहा दिवसांत शंभरावर रुग्णांवर उपचार केले गेले. खासगी रुग्णालयांत याहून जास्त रुग्णांवर उपचार झाले. यापैकी उन्हाचा त्रास असलेल्या रुग्णांची नोंद उष्माघाताच्या श्रेणीत करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगीसह सर्व शासकीय रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी सोमवापर्यंत ११० उष्माघाताचे रुग्ण महापालिकेकडे नोंदवले आहेत. परंतु मेडिकल, मेयोतून अद्याप एकाही रुग्णाची माहिती महापालिकेला दिली गेली नाही. त्यामुळे मेडिकल, मेयोत रुग्णांच्या आजारपणाबाबतचा इतिहास पडताळून पाहिला जातो काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मेडिकल, मेयोकडून उष्माघाताच्या रुग्णांची माहिती महापालिकेला कळवली जात नसल्याबाबत प्रशासनाकडून थेट वैद्यकीय शिक्षण विभागाकडेच तक्रार दिली गेली आहे. परंतु अद्याप त्याचे उत्तर आले नसल्याने ही तक्रार पुन्हा केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

नोंदीचा त्रास टाळण्याचा खटाटोप

मेडिकल, मेयोत रोज पाच हजारांच्या जवळपास रुग्ण येतात. त्यात मोठय़ा संख्येने उन्ह लागल्याने त्रास होणाऱ्यांचाही समावेश असतो. हे रुग्ण सध्या अतिसारासह इतर आजाराच्या गटात नोंदवले जातात. उष्माघातात या रुग्णांची नोंद केल्यास डॉक्टरांचा मन:स्ताप वाढत असल्याने ही टाळाटाळ होत असल्याचे डॉक्टरांच्या गोटातूनच सांगितले जात आहे. रुणालयाच्या एका अधिकाऱ्याने तर अद्याप शहरात फारसे उन्हच पडले नसल्याने हे रुग्ण येणार कसे, असा अजब प्रश्न उपस्थित केला.