शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अल्प

गणित विषयात उच्च शिक्षण घेणारे कधीही बेरोजगार राहत नाहीत असे या क्षेत्रातील मंडळी अभिमानाने सांगत असले, तरी उच्च शिक्षणात गणित विषय घेऊन नवीन संकल्पनांचा शोध घेणारे किंवा त्यात संशोधन करणाऱ्यांची वानवाच आहे. पदवीपासून ते पोस्ट-पीएच.डी.पर्यंत आर्थिक मदत करणारी नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स (एनबीएचएम) सारखी स्वायत्त संस्था आहे मात्र, संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दरवर्षीच अल्प असते.

आपल्याला एक दिवस उपवास करणे, मौन राहणे, खोलीत कोंडून घेऊन जगाशी संबंध तोडणे शक्य आहे पण, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अंकांचा विचार मनात आणायचा नाही, हे आजच्या काळात अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण मानवाचे विश्वच गणिताने व्यापले आहे, असे गणिताचे तज्ज्ञ नेहमीच भाषणातून सांगतात. आपल्या जन्म आणि मृत्यूची नोंदही अंकातच केली जाते. कारण माणसाचे जगणे ते मृत्यू विज्ञानावर आधारलेले आहे. गणिताला आपण आपल्या आयुष्यातून वजा करू शकत नाही. अगदी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी मूलभूत विज्ञानाच्या शाखांबरोबरच अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान हेदेखील गणिताधारित आहे. म्हणून गणिताला ‘विज्ञानाची राणी’ असे अभिमानाने म्हटले जाते. मात्र, संशोधन, नवनवीन गणितीय सिद्धांतांचा विकासाबाबत आपल्याकडे फारच अनास्था आहे. त्याला कारण आजची ‘पॅकेज संस्कृती’. मूलभूत विज्ञानाविषयी नसलेली गोडी असेही सांगितले जाते.

राष्ट्रीय उच्च गणित मंडळ (एनबीएचएम) ही भारत सरकारच्या अणू ऊर्जा विभागांतर्गत १९८३मध्ये स्थापन करण्यात आलेली स्वायत्त संस्था आहे. गणित विषयाच्या विकासासाठी आणि त्यासंबंधीची धोरणे ठरवण्यासाठी एनबीएचएमची स्थापना करण्यात आली. गणित विषयात पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. एनबीएचएमचा उद्देश गणिताचा विकास करणे आणि गणितासंबंधी जे काही उपक्रम होतात त्यांना प्रोत्साहन देणे. याशिवाय गणित ऑलिम्पियाड उपक्रमासाठी होमी भाभा विज्ञान संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक मदत देऊन हा उपक्रम चालवला जातो. तो कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात येतो. याशिवाय परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांबरोबरच ‘इन्स्ट्रमेंटल स्कूल्स’ यांनाही एनबीएचएम आर्थिक मदत करीत असते. विद्यापीठाच्या गणित विभागाच्या ग्रंथालयासाठी अनुदान देणे हादेखील एक उपक्रम राबवला जातो. अर्थात विदर्भातून मिळणारा प्रतिसाद यावर न बोललेच बरे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापकांनी त्यांच्या महाविद्यालयात गणितावर एखादी कार्यशाळा आयोजित केल्यास केवळ परीक्षेत येणाऱ्या संभाव्य प्रश्नांवर विद्यार्थ्यांना शिकवा, अशी तज्ज्ञांकडे गळ घातली जाते. गणित हा विषय केवळ पदवीपासून शिकण्याचा नाही तर अगदी आठवी नववीपासून विद्यार्थ्यांना (उपयोजित) शिकवले जात नाही. गणित शिक्षकांना प्रशिक्षित केले जात नाही. यासंबंधीचे प्रशिक्षण केंद्र मुंबईत आहेत. विदर्भात नाहीत, याविषयीची खंत एनबीएचएमच्या माजी पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

दरवर्षी एनबीएचएम शिष्यवृत्तीची जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवते. एकूण पाच मंडळांमध्ये परीक्षा होतात. महाराष्ट्र मंडळ तीन मध्ये येते. या मंडळातील गोवा, मुंबई, पुणे, वल्लभ विद्यानगर या केंद्रांवर अडीच तासांची लेखी परीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा ६ हजार रुपये दिले जातात. २०१६-१७च्या २३ सप्टेंबरमध्ये एम.ए. व एम.एस्सी.साठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत प्रिया गर्ग, रितिका नायर, अमित पात्रा, अभिदीप रॉय आणि राकेश कुमार हे पाचच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

केंद्र शासन गणितावर मोठा खर्च करते. अगदी गणितात पदवी, पदव्युत्तर शिक्षण, पीएच.डी. आणि पोस्ट-पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती आहेत. याशिवाय प्रकल्प आणि संशोधनासाठीही एनबीएचएम मदत करते. दरवर्षी जेवढी मुले शिष्यवृत्तीसाठी निवडली जातात त्याच्या ४ टक्के मुले आपल्याकडील असतात. म्हणजे ४० विद्यार्थी निवडले गेले तर चार महाराष्ट्रीय असतात. शिष्यवृत्ती देण्याची एक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी येणारे विद्यार्थी कमीच असतात. मुळात मूलभूत विज्ञान शाखांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच असते. त्याला गणित अपवाद नाहीच. गणित हा हमखास रोजगार देणारा विषय आहे. तज्ज्ञांची मागणी सारखी असते. मात्र, विद्यार्थी फारसे येत नाहीत.   – डॉ. आदिनाथ कुलकर्णी, माजी सदस्य सचिव, एनबीएचएम