देवेश गोंडाणे

मुंबई, ठाणे, सोलापूर, नागपूरसह दोन दिवसांआधी अकोला येथेही करोना वार्डातील रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केली. अशा घटना सर्वत्र वाढत असल्याने  करोना रुग्णांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक उपचाराचीही गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा स्थितीत राज्यातील ५२ समाजकार्य महाविद्यालयातून समुपदेशनाचे शिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षित विद्यार्थ्यांना या सेवाकार्यात सहभागी केल्यास करोना रुग्णांची समुपदेशनाद्वारे भीती नष्ट करता येईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

वाढत्या करोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर शर्तीच्या प्रयत्न करीत असले, तरी करोनामुळे घाबरून अनेक रुग्णांचा हृदयविकारानेही मृत्यू होत आहे. काही रुग्ण आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. काही दिवसांआधी नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील ८१ वर्षीय  करोना रुग्णाने आत्महत्या केली.  याशिवाय सोलापूरच्या विलगीकरण केंद्रात साडीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या, ठाणे येथे ग्लोबल हब करोना रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन ७० वर्षीय रुग्णाची आत्महत्या, तर दोन दिवसांआधी अकोल्यात एका रुग्णाची सलाईनच्या नळीने गळा आवळून केलेली आत्महत्या, या साऱ्याच घटना धक्कादाय आहेत.

करोना झाल्यावर समाजकडून मिळणारी दुजाभावाची वागणूक, उपचारासाठी उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांनीही अनेकांचा  जीव जात आहे. त्यामुळे करोना रुग्णांना स्रामुपदेशनाची गरज असल्याचे निष्कर्ष समोर येत आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची सेवा करोना समुपदेशन आणि इतर कामांसाठी घ्यावी, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

आजाराला शारीरिक आणि मानसिक अशा दोन बाजू असतात. आजारामुळे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होतो. करोनामुळे तो अधिकच झाला आहे. सरकारच्या अनेक निर्बंधांमुळे स्वातंत्र्यावर गदा आल्यानेही लोक आत्महत्या करीत आहेत. पाश्चात्य देशांमध्ये अशी महामारीची साथ आल्यावर वैद्यकीय सेवेसह समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची समुपदेशनासाठी मदत घेतली जाते. कारण या विद्यार्थ्यांना मानसिक स्थिती कशी हाताळायची याचा अनुभव असतो. त्यामुळे आपल्या शासनानेही तसा विचार करून समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली तर स्वयंसेवकांची मोठी फळी उभी राहू शकते.

– डॉ. दीपक वलोकर, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स.

पाश्चात्य देशात समुपदेशनाला फार महत्त्व आहे. मात्र, आपल्याकडे आजही त्याविषयी जागरूकता नाही. मुळात समुपदेशक हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. आजार शरीराला असला तरी मानसिक शक्ती कमी झालेली असते. अशावेळी समुपदेशक हा औषधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी मदत करतो. डॉक्टर रुग्णाच्या तनावर तर समुपदेशक मनावर उपचार करीत असतो. आज करोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची यंत्रणाही कमी पडत असताना समाजकार्याच्या विद्यार्थ्यांची मदत घेतल्यास रुग्णांना मानसिक आधार देणे, त्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, चिंतामुक्त करण्यात मोठा हातभार लागेल.

– डॉ. जयश्री कापसे, विभाग प्रमुख, वैद्यकीय व

मन:चिकित्सक समाजकार्य विभाग,

एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर.

करोना ही केवळ आरोग्याची समस्या नसून ती मनोसामाजिक आणि आर्थिक समस्याही आहे. लोकांमध्ये करोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजकार्याचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी रुग्णांना मानसिक आधार देणे,  भीती दूर करणे, प्लाझ्मा, रक्तदानासाठी लोकांना प्रेरित करणे, आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत मिळवून देणे, नातेवाईकांचे समुपदेशन करणे अशा विविध पातळ्यांवर काम करू शकतात. त्यामुळे राज्य शासनाने या विद्यार्थ्यांची सेवा घेतल्यास या महामारीशी दोन हात करण्यास मोठा आधार मिळेल.

– प्रा. अंबादास मोहिते, संस्थापक अध्यक्ष,  महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स.