देवेश गोंडाणे

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट घोंघावत असताना पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांची पदे  मात्र रिक्त  आहेत. राज्यात ६ हजार ६०० पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ १७६३ अधिकारी सेवेत आहेत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’वर नियंत्रणाची प्राथमिक जबाबदारी असणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांअभावी सरकार या संकटावर कशी मात करणार, हा मोठाच प्रश्न  आहे.

देशभरात करोना प्रादुर्भावाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसताना  मुंबई, पुणे, बीड, नागपूरसह अनेक शहरांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला असून कावळे, पोपट आणि कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे.

‘व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या १९८४ च्या निकषानुसार, पाच हजार जनावरांमागे (पशु, पक्षी इ.) एक पशुवैद्यक (व्हेटरनरी डॉक्टर) असला पाहिजे. २०१९-२०च्या एका संशोधनानुसार, राज्यात ३ कोटी ३० लाख पशु, पक्षी असून निकषांनुसार ६,६०० पशुवैद्यकांची गरज आहे. मात्र, राज्यात केवळ २१९२ पदांना मंजुरी आहे. यापैकी १७६४ पदांवर भरती करण्यात आली आहे.

२००६ मध्ये ‘बर्ड फ्लू’ या विषाणूचा भारतात पहिल्यांदा प्रादुर्भाव दिसून  झाला होता. देशात या विषाणूमुळे पंधरा वर्षांत एकही व्यक्ती दगावली नसली तरी ‘बर्ड फ्लू’मुळे मोठय़ा प्रमाणावर पक्षी दगावत आहेत. कुक्कुटपालन व्यवसायावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहेत. मात्र, अशा साथ रोगांवर नियंत्रण मिळवणाऱ्या आरोग्य सुविधेची गावपातळीवर सोयच नाही. चार-पाच गाव मिळून एक पशुधन विकास अधिकारी असतो. त्यामुळे पक्षी, गुरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. असे असतानाही सरकारकडून पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे.

निकष काय?

शासन निर्णय ३०-४-१९९१ अन्वये राज्यात सन २००० नंतर दर ५००० पशुधन घटकामागे १ पदवीधर पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन्यासंदर्भात राष्ट्रीय कृषी आयोगाने केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.   बिगर डोंगरी भागात दर ५००० पशुधन घटकामागे १ पशुवैद्यक दवाखाना असावा व डोंगरी भागात दर ३००० पशुधन घटकामागे १ पशुवैद्यक दवाखाना असायला हवा. मात्र, सरकारकडून  निकषानुसार पदभरती केली जात नसल्याचे चित्र आहे.

परीक्षा झाली, पण निकाल प्रलंबित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २३ ऑगस्ट २०१९ रोजी पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या ४३५ पदांसाठी जहिरात देण्यात आली होती. यासाठी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील हजारो पदवीधरांनी  २२ डिसेंबर २०१९ ला परीक्षाही दिली. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटला तरी परीक्षेचा निकाल व मुलाखती झालेल्या नाहीत. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने तातडीने मुलाखत घेत नवीन पशुवैद्यकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

‘बर्ड फ्लू’मुळे मनुष्यहानी झाल्याची अद्याप एकही घटना नाही. आपल्याकडे अन्न  शिजवून खाल्ले जात असल्याने विषाणूचा नायनाट होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, आता पक्षांचे जीव वाचवणे हे एक आव्हान आहे.

-डॉ. मुकुंदा कदम, तज्ज्ञ, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर.