रुग्णालयातील  जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यापासून तर, तो वाहनांमध्ये टाकण्यापर्यंतच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा केला जात असल्याची बाब शहरातील रामदासपेठ परिसरात उघडकीस आली.

शहरातील प्रत्येक रुग्णालयातून महिन्याअखेरीस सरासरी ५० ते ७० किलो  जैव वैद्यकीय कचरा तयार होतो. शहरात अधिकांश रुग्णालये रामदासपेठ परिसरात आहेत. तेथील कचरा उचलून नेण्याचे कंत्राट सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल(इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीकडे आहे. शुक्रवारी सकाळी या परिसरात जैव वैद्यकीय कचरा उलचून नेणारे वाहन(एम.एच.३१ ई.एन. ०९९८) एका  रुग्णालयापासून ५०० मीटरवर उभे होते. या कंपनीचे कर्मचारी तोंडाला मास्क न लावता आणि हातमोजे न घालता रुग्णालयातील कचऱ्याच्या पिशव्या वाहनात टाकत होते. पिशव्या टाकताना काही वाहनाच्या दारातच अडकत होत्या. काही पिशव्या फुटून त्यातून वापरलेले इंजेक्शन्स, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस आणि इतर जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावर पडत होता.

ग्रीन विजिलचे कौस्तुभ चटर्जी व त्यांची चमू त्या परिसरातून जात असताना त्यांना हा सर्व प्रकार निदर्शनास आला. त्यांनी कर्मचाऱ्यांना हटकले असता सुरवातीला त्यांनी वाहन रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नाही. एक वाहन नादुरुस्त आहे. त्यामुळे याच पद्धतीने जैव वैद्यकीय कचरा उचलावा लागणार असे सांगितले. दरम्यान, ग्रीन विजिलच्या पदाधिकाऱ्यांनी कायद्याची तंबी दिली तेव्हा दोन-चार कर्मचाऱ्यांनी हातमोजे घातले आणि तेथून रवाना झाले. या घटनेची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली आहे.

एजन्सीमार्फत कचरा संकलन

जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असते. त्यांच्यामार्फत रुग्णालयात गोळा होणारा कचरा संकलित करण्याचे काम स्वतंत्र एजन्सीला दिले जाते. हा कचरा संबंधीत संस्थेकडे दिला जात असल्याची नोंद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे रुग्णालय संचालकांना बंधनकारक आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावे लागते.

कंपनीला नोटीस

या संपूर्ण प्रकाराची तक्रार आमच्याकडे आलेली आहे. जैव वैद्यकीय कचरा योग्य पद्धतीने उचलला जावा आणि त्यात हलगर्जीपणा नको. हा कचरा उचलण्याची जबाबदारी  सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल(इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीकडे आहे आणि त्यांनी हलर्गीपणा केला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकाराबद्दल नोटीस बजावण्यात येत असल्याचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहूल वानखेडे यांनी सांगितले.