काम करणाऱ्या महिलांसाठी शहरात अनेक वसतिगृहे असली तरी दोन-तीन महिला खोली किंवा फ्लॅट करून राहणेच पसंत करतात. त्यामुळे महिलांच्या वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे.

शिक्षणामुळे आणि त्यानंतर नोकरी, व्यवसायाच्या बांधीलकीमुळे महिलांचे घराबाहेर राहणे वाढले आहे. त्यामुळेच १९७२-७३मध्येच केंद्र शासनाने नोकरी  करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह सुरू केले आणि ते चालवणाऱ्या संस्थांना अनुदानही देऊ केले. सोबतच अशा वसतिगृहांमध्ये पाळणाघरेही जोडली. जेणेकरून अशा महिलांसोबत त्यांची मुलेही राहावीत, असा दूरदृष्टीचा विचार त्यावेळी शासनाने केला. मात्र, तेव्हापासून जी कोणती वसतिगृहे अस्तित्वात आली त्यानंतर त्यात वाढ झालेली नाही. जेव्हा की काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. या वसतिगृहात सहज फेरफटका मारला असता काम करणाऱ्या महिला बोटावर मोजण्या इतपत असल्या तरी शिक्षण घेणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने आहेत.  साधारणत: खासगी क्षेत्रात कमी पगारावर काम करणाऱ्या महिला वसतिगृहात राहणाऱ्यापेक्षा दोघी-तिघी एकत्र खोली करून राहणे पसंत करतात.

वसतिगृहाचे भाडे चार हजार रु. महिना

नागपुरातील वसतिगृहांमध्ये वर्किंग विमेनला चार हजार रुपये भाडे भरावे लागते. त्यात दोन वेळचे जेवण, एक नास्ता आणि दोन वेळच्या चहाचा समावेश आहे. खोलीत फर्निचर, पंखा, विजेसह चांगली सोय आणि सुरक्षा तर आहेच आहे. साधारणत: सात वाजेपर्यंत काम करणाऱ्या महिला वसतिगृहात येतात. विद्यार्थिनी आठ वाजेपर्यंत येण्याची संधी घेतात. नऊ वाजता मात्र, वसतिगृहाचे फाटक बंद केले जाते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहात ठेवण्यास नकार असतो.

वसतिगृहे सुरक्षित

मी केरळहून आले आहे. काम करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहात राहायला मला आवडते. येथे सुरक्षाही असते आणि एक भावनिक आधारही असतो. मी खोली करून राहिले असते तर एकटेच राहावे लागले असते. काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला असताना माझ्या रूम पार्टनरने मदत केली होती.  त्यामुळे वसतिगृहात राहणे मला सुरक्षित आणि सोयीचे वाटते.    – रोशनी आर.,केमिस्ट

आम्ही काम करणाऱ्या महिलेलाच प्राधान्य देतो. पण, महिला फारशा येत नाहीत. त्यामुळे खोल्या खाली ठेवण्यापेक्षा विद्यार्थिनींना देतो. आमच्याकडे काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असली तरी सरकारी नोकरी करणाऱ्या, व्यवसाय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच महिला आहेत. महिला वसतिगृहात राहण्यापेक्षा अधूनमधून कुटुंबीय आले तर त्यांच्याबरोबर राहणे सोपे होईल, म्हणून खोली किंवा फ्लॅट घेऊन राहणे पसंत करतात.    – कल्पना भुते, वार्डन, मातृसेवा संघ महिला वसतिगृह

नागपुरातील महिलांची वसतिगृहे

  • मातृसेवा संघ कामकर्त्यां महिलांचे वसतिगृह, बजाजनगर
  • सरस्वती मंदिर डब्ल्यूडब्ल्यूएच, टिळकनगर मार्ग
  • अखिल भारतीय महिला परिषद, उत्तर अंबाझरी मार्ग
  • डिप्रेस्ड क्लासेस डब्ल्यूडब्ल्यूएच, अमृत भवनच्या बाजूला
  • मानव मंदिर, मैत्री छाया, न्यू सुभेदार लेआऊट
  • यंग विमेन्स ख्रिश्चन असोसिएशन डब्ल्यूडब्ल्यूएच, सिव्हिल लाईन्स
  • विमेन्स पॉलिटेक्निक एज्युकेशन इन्स्टिटय़ूट, टिळकनगर
  • भगिनी निवेदिता डब्ल्यूडब्ल्यूएच, सोमलवाडा
  • समाजविकास संस्था, महाल