वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण गंभीर झालेले असताना प्लॉस्टिक, रबरसारख्या वस्तू जाळून नागरिकांचे जीवन धोक्यात घालण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असल्याचे दिसून आले आहे. प्रतापनगरातील डम्पिंग यार्डमध्ये ‘केबल’ जाळताना स्थानिक नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्यांना रंगेहात पडकले. अशा प्रकारे शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळून आरोग्यास धोकादायक धूर निर्माण केल्या जात आहे.
शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट असलेल्या कनक र्सिोस कंपनीचे कर्मचारी कचरा जाळण्यात असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका आहे. न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्यांना परिपत्रक काढून कचरा जाळण्याबाबत ताकीद देण्याचे निर्देश दिले आहेत. अशाप्रकारचे परिपत्रक काढण्यात आल्याचे महापालिकेने न्यायालयात सांगितले आहे. मात्र, गेल्या मंगळवारी प्रतापनगर, राधे मंगलम् हॉलसमोरील डम्पिंग यार्डमध्ये सफाई कर्मचारी केबल जाळत असल्याचे आढळून आले आहे.
महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने न जाळण्याची तंबी देण्यात आली आहे. असे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील महापालिकेने केली आहे.
उच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. परंतु हा प्रकार थांबलेला नाही. सफाई कामगार मोठय़ा प्रमाणात खुल्या जागेवर कचरा जाळत आहेत. यात गंभीर बाब म्हणजे प्लॉस्टिक आणि रबर असलेल्या जाळले जात आहेत. त्यातल्या त्यात त्यांना आपल्या कृतीमुळे काय होऊ शकते, याची कल्पना सफाई कामगारांना नसते. प्लॉस्टिक, रबर किंवा नष्ट होणारे पदार्थ जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाची त्यांना कल्पना नसते.
यामुळे आरोग्यास धोका ठरत आहे. शहराच्या विविध भागातून ‘लोकसत्ता’कडे तक्रारी आल्या आहेत. प्रतापनगर, आयुर्वेदिक ले-आऊट, नरेंद्रनगर या भागात सफाई कर्मचारी निष्काळजीपणे कचरा जाळत असतात. कचरापेटी मुक्त शहर ही संकल्पना नागपुरात राबवण्यात येत आहे. यामुळे कचरा उचलणारे दारावर येतात. रस्ते, मैदान, मोकळे भूखंड आणि फुटपाथवरील कचरा झाडणारे मात्र कचरा गोळा करून तेथेच जाळत असल्याचे आजही दिसून येत आहे.

दमा वाढला
कचरा जाळण्यात येत असल्याने होणाऱ्या वायू प्रदूषणाचा धोकादायक परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. त्यातील घटकांमुळे फुफ्फुसांना हानी पोहोचते. त्यामुळे दमा वाढीस लागतो. धूर श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत केल्यानंतर फुफ्फसे व श्वसन नलिका ते विरघळण्यासाठी जास्तीतजास्त कफाची निर्मिती करतात. त्यामुळे सर्दी होते. सर्दी जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते.

धुरामुळे नाक वाहणे, कफ होणे, डोळे येणे आणि अस्थमा होतो. सततच्या धुरामुळे फुफ्फुसाचे आजार होतात. नागपूर महापालिकेने वैज्ञानिक पद्धतीने, सुरक्षित पद्धतीने घन कचरा व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. पंरतु अशाप्रकारे कचरा जाळून त्यावरचा उपाय नाही. प्लॉस्टिक, रबर यासारखे पदार्थ जाळल्यानंतर निघणाऱ्या विषारी धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सातत्याने धुराच्या संपर्कात आल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते.
– डॉ. सुधीर गुप्ता
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल