भूमाफिया दिलीप ग्वालबंशी याचे भूखंड हडपण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता अनेकजन पोलिसांकडे तक्रार करीत आहेत. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हरिष ग्वालबंशी यांने आपला भूखंड हडपल्याची तक्रार एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने केली आहे. आयुष्याच्या कमाईतून खरेदी केलेला भूखंड गेल्याने त्यांच्याकडे आता कुटुंबासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे ते कुटुंबाला एका छोटय़ा घरात ठेवून स्वत: मंदिरात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बाबाराव ढोमणे असे तक्रारदार सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते २०१४ मध्ये नागपूर पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांनी २००२ मध्ये मकरधोकडा परिसरातील नर्मदा हाऊसिंग सोसायटीमध्ये १ हजार ५०० चौरस फूटाचा भूखंड विकत घेतला होता. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशातून त्या ठिकाणी घर बांधू आणि संपूर्ण कुटुंबासह राहू असा, त्यांचा विचार होता. परंतु त्यानंतर काही दिवसांतच त्या ठिकाणी हरिष ग्वालबंशी यांच्या माणसांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले. त्यानंतर त्यांनी तोच भूखंड दुसऱ्याला विकला. अशाप्रकारे अनेकांचे भूखंड हडपले. हे भूखंड सोडविण्यात यावे आणि मूळ भूखंड मालकांना परत करण्यात यावे, अशी मागणी ढोमणे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांच्याकडे केली आहे.

बाबाराव ढोमणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, हरिश ग्वालबंशी यांनी भूखंडांवर आपल्या लोकांमार्फत अतिक्रमण करविले. त्यानंतर ते भूखंड दुसऱ्यांना विकले. जवळपास २९ सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे नर्मदा हाऊसिंग सोसायटीत भूखंड आहेत. आपल्या गुंडांमार्फत ते आपल्याला वेळोवेळी धमकावतात आणि त्या भूखंडाच्या ठिकाणी न जाण्यासाठी सांगतात.

भूखंड हडपल्यापासून कुटुंबासाठी पुरेशी जागा आपल्याकडे नाही. त्यामुळे पत्नीसह मुलाबाळांना एका छोटय़ाशा घरात ठेवले आहे असून मी स्वत: एका हनुमान मंदिरात वास्तव्याला आहे. यासंदर्भात अनेकांकडे तक्रार केली. आतातरी आपल्याला न्याय मिळावा, असेही ते यावेळी म्हणाले.

विशेष तपास पथक

भूमाफिया दिलीप ग्वालबंशी आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपायुक्त राकेश कलासागर यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नेमले आहे. यात सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे, कळमन्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, प्रॉपर्टी सेलचे निरीक्षक वजिर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, गजेंद्र राऊत, संतोष दरेकर, नम्रता जाधव यांचा समावेश आहे.

आपला काहीही संबंध नाही

नर्मदा हाऊसिंग सोसायटी आपल्या घराशेजारी आहे. मात्र, त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून आदिवासी लोकांचे अतिक्रमण आहे. २०१२ मध्ये अनेकजन त्या ठिकाणी जागा रिकामी करण्यासाठी पोहोचले. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आदिवासी लोकांशी आपल्याशी संपर्क केला होता. आदिवासींची मदत केल्याने भूखंडांवर दावा सांगणाऱ्यांनी आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. शिवाय ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

हरिष ग्वालबंशी, नगरसेवक, काँग्रेस