लांबचा प्रवास म्हटला की सोबत सामान घेणे आलेच. अलीकडे बहुतांश प्रवाशांकडे भ्रमणध्वनी आणि लॅपटॉप प्रवासात असतोच असतो. शार्विकांना देखील नेमके याच दोन्ही उपकरणांवर हात साफ करण्याचे कसब अवगत झाले आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे प्रवाशांच्या सर्वाधिक याच वस्तू चोरीला गेल्या आहेत.
नागपूर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत १२ महिन्यात ५७९ भ्रमणध्वनी रेल्वे बोगीतून चोरी गेले आहेत. त्याच्या पाठोपाठ लॅपटॉप चोरीचा आकडा आहे. प्रवासादरम्यान प्रवासी झोपले असताना, प्रवासी वॉशरुममध्ये असता या वस्तू चोरी गेल्याचे दिसून येते. शिवाय अनेकदा प्रवास संपल्यानंतर वस्तू चोरी गेल्याचे प्रवाशांच्या लक्षात येते. नागपूर रेल्वेचा आवाका २३ जिल्ह्य़ांचा असून १६ रेल्वेस्थानक त्याअंर्तगत येतात. गुन्ह्य़ांची संख्या आणि छडा लावण्याचे प्रमाण व्यस्त आहे. गेल्या वर्षभरात केवळ २२ टक्के गुन्ह्य़ांचा शोध लागला आहे.
रेल्वे डब्यात प्रवाशांचे सामान सुरक्षित नाही पण रेल्वे प्रतीक्षालयातही नाही, अशी अवस्था आहे. गाडीला विलंब असल्याने प्रवासी प्रतीक्षालयात थांबतात. प्रवासी वॉशरुममध्ये गेला किंवा त्याला डुलकी आल्यास सामानांची चोरी होते. काही महिन्यांआधी मुलाखत ओटोपून मुंबईहून नागपूरला परत येत असताना डब्यातून एका युवकाची बॅग चोरी गेली. ही बॅग नाशिकच्या एका चौकात पडलेली आढळली होती. या बॅगमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र होते आणि काही वस्तू होत्या. चोरांनी शूज, काही कपडे आणि वस्तू काढून कागदपत्रासह बॅग फेकून दिली होती. नाशिक पोलिसांनी संबंधित युवकाशी संपर्क साधून बॅग परत केली होती. चोरांनी किमान शैक्षणिक कागदपत्राचे महत्त्व जाणून बॅग चौकात टाकल्याने युवकाला येणाऱ्या पुढील अडचणी कमी झाल्या. परंतु रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे पोलीस हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
नागपूर रेल्वेची हद्द मोठी असून मंजूर पदे देखील भरली जात नाहीत. यामुळे गुन्ह्य़ांना प्रतिबंध आणि गुन्हे हुडकून काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागपूर रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. मंजूर पदाच्या केवळ २५ टक्के पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कार्यक्षेत्र मोठे आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी यामुळे नागपूर रेल्वे पोलीस कार्यक्षेत्राचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे. नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे पोलीस ठाणे पुण्याला जोडण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे दोन अर्थसंकल्प झाले आहेत. दोन्ही अर्थसंकल्पात सुरक्षा देण्याचे सुतोवाच केले. परंतु प्रत्यक्षात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत. प्रवास भाडे वाढवले जात आहे. सुरक्षेचा अधिकार लावण्यात येतो तर मग प्रवाशांना सुरक्षा दिली का जात नाही. रेल्वेत प्रवासी अजिबात सुरक्षित नाही. अनेकदा लॅपटॉप, भ्रमणध्वनीतील माहितीच्या आधारावर ‘ब्लॅकमेल’चे प्रकार घडले आहेत. रेल्वे पोलिसांची संख्या वाढवून प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली जावी, असे रेल्वे यात्री संघाचे बसंत शुक्ला म्हणाले.

नागपूर रेल्वे पोलिसांची हद्द ३६८७ कि.मी. आहे.
या रेल्वे मार्गावर ३८४ रेल्वेस्थानके आहेत.
या मार्गावरून दररोज २०० ते ३०० गाडय़ा धावतात.
सर्वाधिक मोबाईल आणि लॅपटॉप चोरी