जम्मू-काश्मीरमध्ये सीमेजवळच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देताना शहीद झालेले भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळगावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण काटोल शोकमग्न झाले होते. शहीद भूषण काटोलचे असल्याची अभिमानाची भावनाही लोकांमध्ये दिसून आली.

शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भूषण सतई यांना वीरमरण आले. भूषण हे काटोल येथील असून  ते फैलपुरा येथे राहत होते. त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सोमवारी सकाळी नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. लष्कराच्या विशेष दलाने पार्थिव सन्मानपूर्वक स्वीकारले.

यावेळी विमानतळावर भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एनसीसी कामठीचे कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंतकुमार पांडे आदी उपस्थित होते.

शहीद भूषण रमेश सतई यांना प्रथम कामठी येथील संरक्षण विभागाच्या रुग्णालय परिसरात सोमवारी सकाळी विशेष मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मूळगावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भूषण ६- मराठा बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते. लष्करात निवड झाल्यानंतर ते मराठा बटालियनमध्ये रुजू झाले. गेल्या एक वर्षांपासून त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये होती. त्यांच्या पश्चात वडील रमेश धोंडूजी सतई, आई मीराबाई सतई, लहान भाऊ लेखनदास सतई व बहीण सरिता सतई असा परिवार आहे.

जोंधळे यांनाही अखेरचा निरोप

पाक सीमेवर शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे (२०) यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाला त्यांचे चुलत बंधू दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला.