राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर विधानभवनावर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारात १० आंदोलक जखमी झाले आहेत. नागपूर विधानभवन परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी विधानभवनावर मोर्चा काढला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलीस बॅरिकेट्स तोडून विधानभवन परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला.