अपहरण, हत्यासत्राने पोलिसांसमोर आव्हान

गेल्या काही दिवसांत उपराजधानीत खुनांच्या घटनांचे सत्र सुरू आहे. या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरातच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराचा विकास झपाटय़ाने होत असताना येथील गुन्हेगारी नेहमीच राज्यात चर्चेचा विषय राहिली आहे. अधिवेशनाच्या तोंडावर शहरातील खुनाच्या सत्रांनी पोलिसांसह मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या १ नोव्हेंबरला केवळ दोन हजार रुपयांच्या वादातून जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनू ऊर्फ समीर कलाम शहा या तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर दोनच दिवसांनी ३ नोव्हेंबरला नीरी परिसरात प्राचार्य डॉ. मोरेश्वर ऊर्फ महेश महादेव वानखेडे (६१) रा. नरेंद्रनगर, यांचा तलवारीने गळा चिरून खून करण्यात आला. पत्नी व मुलीने सुपारी देऊन भाडोत्री गुंडांकडून त्यांची हत्या केली. त्या घटनेने शहरात खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असताना लकडगंज पोलिसांनी चार खून करणाऱ्या दुर्गेश ऊर्फ छल्ला ध्रुपसिंग चौधरी (२८) रा. रेणुकानगर, या ‘सीरियल किलर’ला अटक केली. त्याने कामठी व लकडगंज परिसरांत तीन खून केले होते. विशेष म्हणजे तो ‘समलैंगिक’ असून अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी लहान मुलांना हेरून त्यांचा खून करायचा. त्यानंतर १७ नोव्हेंबरला लॉटरी व्यापारी राहुल सुरेश आग्रेकर (३६) रा. दारोडकर चौक याचा १ कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला. त्या प्रकरणात आरोपी दुर्गेश बोकडे व पंकज हारोडे अद्यापही फरार आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आग्रेकर याला न्याय मिळवून देण्यासाठी व्यापारी आंदोलन करीत आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० नोव्हेंबरला जितेंद्र हरिराम काळबांडे (३४) याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच २३ नोव्हेंबरला सोनेगाव व सदर पोलीस ठाण्यात चार तासांच्या अंतराने दोन खून झाले. शहरात सुरू असलेल्या खुनाच्या सत्राने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

खंडणी व अपहरणासाठी व्यापारी लक्ष्य

खंडणीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलांचे अपहरण करण्याच्या घटना शहरात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. खंडणी न मिळाल्यामुळे मुलांची हत्याही करण्यात आली; पण प्रथमच राहुल सुरेश आग्रेकर या व्यापाऱ्याचेच अपहरण करून त्याला संपवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण व्यापार जगत ढवळून निघाले आहे. राहुलपूर्वी २९ मे २००० रोजी सराफा व्यापारी नीलेश पारेख यांचा दीड वर्षांचा मुलगा आदित्यचे अपहरण झाले. त्या वेळी ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र, या घटनेला १७ वष्रे उलटूनही आदित्य अद्याप सापडला नाही. २५ सप्टेंबर २००० ला अगरबत्ती व्यावसायिक हसमुख ठकराल यांचा सव्वा वर्षांचा मुलगा हरेकृष्ण याचे त्यांच्याच कर्मचाऱ्याने अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागितली होती. मात्र अपहरणकर्त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने हरेकृष्ण याची हत्या करण्यात आली. ११ ऑक्टोबर २०११ ला मसाला व्यापारी प्रशांत कटारिया यांचा आठ वर्षांचा मुलगा कुश याचे अपहरण करून त्याचा खून शेजारी राहणाऱ्या आयुष पुगलियाने केला. त्या वेळी आयुषने त्याच्या वडिलांकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, तर १० जुलै २०१३ ला खापरी येथील रहिवासी यश बोरकर याचे अपहरण करून २ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला, तर दंतरोगतज्ज्ञ महेश चांडक यांचा मुलगा युगचे अपहरण करून १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्याने १ सप्टेंबर २०१४ ला त्याचा खून करून मृतदेह पुरण्यात आला होता. आता राहुलचे अपहरण झाले व १ कोटीच्या खंडणीसाठी खून करण्यात आला.

गुन्हेगारांची नवी पिढी

पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत शोधमोहीम राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील अनेक गुन्हेगार कारागृहात आहेत, तर काही गुन्हेगार फरार आहेत. त्यामुळे गुन्हेगारांकडून घडणाऱ्या गुन्ह्य़ांत घट झाली आहे. शिवाय पोलिसांनी गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, व्यसनाधीन तरुणांकडूनही अशा प्रकारे गंभीर गुन्हे घडत असून गुन्हेगारांची नवीन पिढी तयार होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.