धंतोलीतील भूखंडाचे बनावट दस्तावेज तयार केल्याची एसआयटीकडे तक्रार

लक्ष्मीरतन बिल्डर्स पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता असून संचालक सागर रतन यांच्याविरुद्ध बनावट दस्तावेज तयार करणे आणि भूखंड विकण्यासाठी दबाव टाकण्याची तक्रार विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात आली असून त्यावर चौकशी सुरू आहे. लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

बेसा परिसरातील मिलिंद गृहनिर्माण सोसायटीची ४ एकर जमीन बिल्डरने बळकावल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर एसआयटीने गुन्हा दाखल करून कंपनीचे संचालक सागर सत्यनारायण रतन आणि गृहनिर्माण सोसायटीचे सचिव विकास जैन यांना अटक केली होती. त्या प्रकरणात संदीप जैन अद्याप फरार आहे. त्याशिवाय लक्ष्मीरतन बिल्डर्सने दाभा परिसरातील भूखंड बळकावल्याच्या तक्ररी प्राप्त झाल्या होत्या आणि आता धंतोली परिसरातील ६ हजार ३०० चौरस फुटाचे भूखंड मिळविण्यासाठी बनावट दस्तावेज तयार केल्याची तक्रारही एसआयटीला प्राप्त झाली.

रत्ना आलोककुमार द्विवेदी (५८) आणि मुलगा अनिरुद्ध आलोककुमार द्विवेदी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांचे धंतोली परिसरातील वॉर्ड क्रमांक-४ अंतर्गत प्लॉट क्रमांक-७२ येथे ५८४ चौरस मीटर म्हणजे ६ हजार ३०० चौरस फुटाचे भूखंड व त्यावर घर आहे. गेल्या काही वर्षांपासून सागर रतन यांचा या भूखंडावर डोळा असून वेळोवेळी वेगवेगळी माणसे पाठवून भूखंड विक्रीसाठी दबाव टाकला जातो. भूखंड विक्रीस नकार दिल्याने त्यांनी त्यांचे पती आलोककुमार यांना हाताशी धरले आणि त्यांची बनावट दस्तावेजावर स्वाक्षरी घेतली. आलोककुमार हे मनोरुग्ण आहेत.

त्यांच्या हातामध्ये ५ लाखाचा धनादेशही दिला होता. ही माहिती मिळताच बिल्डर्सचे ५ लाख रुपये परत करण्यात आले. जमीन ही ५ ते ७ कोटी रुपयांची आहे. त्यांनी बनावट दस्तावेजाद्वारे हा व्यवहार केला आहे, असा आरोप द्विवेदी कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारची तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले.

प्रकरण न्यायप्रविष्ट

द्विवेदी कुटुंबीयांनी प्रथम भूखंड विकण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यानंतर विक्रीपत्र करून देण्यापूर्वीच निर्णय बदलला. त्यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असून एसआयटीसमोरही तसे पुरावे सादर केले आहेत.

सागर रतन, संचालक, लक्ष्मीरतन बिल्डर्स.