* सर्वच पक्षांना घराणेशाहीची कीड
* महापालिका निवडणूक

महापालिकेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊ, असे जाहीरपणे सांगत असले तरी प्रत्यक्षात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करताना मात्र नेते आपल्या नातेवाईकांची नावे पुढे करू लागले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीविरुद्ध कितीही ओरड होत असली तरी ही कीड सर्वच पक्षांना लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.

महिलांसाठी राखीव झालेल्या वॉर्डात पत्नी किंवा मुलीसाठी तर खुल्या प्रवर्गातील वॉर्डासाठी आपल्या नावासाठी सर्वपक्षीय ज्येष्ठ विद्यमान नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मावळत्या महापालिकेतील सर्वपक्षीय सदस्यांच्या नावांवर नजर टाकली तर त्यातही घराणेशाहीची परंपरा चालविणारे नगरसेवक आणि नगरसेविका मोठय़ा संख्येने दिसून येतात. यापैकी काहींनी एकदा संधी मिळाल्यावर आपले कर्तृत्व सिद्ध केले तर काही ओळख हरवून बसले. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात उमेदवारांची चाचपणी सुरू झाल्यावर प्रस्थापित नेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातून त्यांची कन्या दीक्षा राऊत हिच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दीक्षाचे नाव काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीत आहे. काँग्रेसच्याच विद्यमान नगरसेविका हर्षला साबळे यांचा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे यावेळी येथे त्यांचे पती मनोज साबळे इच्छुक आहेत. २०११ मध्ये हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने साबळे यांनी पत्नीसाठी उमेदवारी आणली होती, हे येथे उल्लेखनीय. ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांचे पुत्र निशांत गांधी यांनी भाजपकडून सिव्हिल लाईन भागातून उमेदवारी मागितली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी महापौर माया इवनाते यांच्या कन्येचे नाव भाजप इच्छुकांच्या यादीत आहेत. मुन्ना यादव आणि अविनाश ठाकरे यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तेथे त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न आहे. काँग्रेस नेते तानाजी वनवे यांची पत्नी मालू वनवे विद्यमान नगरसेविका आहेत. यावेळी त्यांचा वॉर्ड खुल्या गटासाठी मोकळा झाल्याने तानाजींनी मुलासाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीपही दक्षिण नागपुरातून रिंगणात उतरणार आहेत. भाजपच्या काही विद्यमान सदस्यांनी महिलांसाठी आरक्षित प्रभागात पत्नीला तर खुल्या प्रवर्गातील प्रभागातून विद्यमान महिला सदस्यांच्या पतीने प्रयत्न सुरू केले आहे. सध्या प्राथमिक स्तरावरील हे चित्र आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या नेत्यांना घराणेशाहीपासून दूर राहा, असे स्पष्ट शब्दात बजावले आहे. मात्र, पक्षातील उमेदवारीच्या मोर्चेबांधणीत याउलट चित्र दिसत आहे. निवडून येण्याची क्षमता हा सर्वात मोठा निकष सर्वच पक्षांनी निश्चित केला आहे. या निकषात बसणारी घराणेशाही सर्वच पक्षातून दुर्लक्षित केली जाते, असा आजवरचा अनुभव आहे.