मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप उत्तर नाही, मराठवाडय़ाचे सुपुत्र असलेल्या सांस्कृतिक मंत्र्यांचीही पाठ

शफी पठाण, लोकसत्ता

नागपूर : उस्मानाबाद येथे आयोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा अकारण राबता राहणार नाही, असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अगदी पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरवली आहे.

सरकारकडून या संमेलनाला ५० लाखांचा निधी मिळत असल्याने दरवर्षी या संमेलनाच्या उदघाटन, समारोपाला व्यासपीठावर मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांची खुर्ची हमखास आरक्षित असायची, परंतु नेत्यांच्या सरबराईत संमेलनाध्यक्ष व इतर साहित्यिकांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नेहमीचीच बाब व्हायला लागली. किमान उस्मानाबादच्या संमेलनात तरी ही प्रथा मोडून राजकारण्यांना प्रेक्षकांच्या रांगेत आणि साहित्यिकांना मंचावर बसवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. तसे अप्रत्यक्षपणे जाहीरही करण्यात आले. परंतु दरवर्षी ५० लाख रुपयांचा निधी संमेलनासाठी दिला जात असताना शासनाचा मान राखणेही गरजेचे होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व इतरही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली. परंतु संमेलनाचे उद्घाटन एका दिवसावर आले असतानाही अद्याप कुणाचाही संमेलनात येण्याबाबत होकार मिळालेला नाही.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून तीन दिवसांतील एकूण सत्रांबाबत विचारणा झाली. परंतु मुख्यमंत्री येणार की नाही, याबाबत काहीच सांगण्यात आले नाही. विशेष म्हणजे, हे संमेलन ज्या मराठवाडय़ात होत आहे तेथीलच सुपुत्र असलेले राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख हेसुद्धा संमेलनाला येणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. यंदाच्या संमेलनात व्यासपीठावर राजकारण्यांची भाऊगर्दी नसणार, अशी भीमगर्जना आधीच केल्याने व आता त्यापासून मागे हटणे शक्य नसल्याने आयोजकांची कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे व्यासपीठावर खुर्चीच मिळणार नसेल तर तिथे जाऊन तरी काय करायचे, असा व्यवहारी विचार राजकीय नेते करीत आहेत. संमेलनाकडे अघोषितपणे पाठ फिरवणाऱ्या या नेत्यांनी संमेलनाच्या स्मरणिकेसाठी मात्र आपल्या हसऱ्या छायाचित्रांसह शुभेच्छापत्रे अगदी वेळेत आयोजकांकडे रवाना केली आहेत.

आम्ही  संमेलनाच्या शिरस्त्याप्रमाणे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री व इतरही राजकीय नेत्यांना निमंत्रणे पाठवली आहेत. परंतु अद्यापतरी कुणाचाही अधिकृत होकार मिळालेला नाही. साहित्यप्रेमी म्हणून त्यांचे या संमेलनात स्वागतच आहे.

– नितीन तावडे, स्वागताध्यक्ष.