क्रांतिकारक भाई परमानंद यांच्या पुण्यातिथीनिमित्त ८ डिसेंबरला टिळक पुतळा, महाल येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात भाई परमानंद यांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे अध्यक्ष व हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते अरुण जोशी यांनी भाई परमानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. भाई परमानंद एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. आर्य समाज व वैदिक धर्माचे ते कट्टर प्रचारक होते.

तसेच थोर क्रांतिकारक सरदार भगतसिंग, सुखदेव, पं. रामप्रसाद बिस्मिल सारखे असंख्य राष्ट्रभक्त युवकांचे भाई परमानंद प्रेरणास्थान होते, अशा शब्दात अरुण जोशी यांनी भावना व्यक्त केल्या. अखंड हिंदुस्थानचे विभाजन होऊन पाकिस्तानच्या निर्मितीची भविष्यवाणी १९३० मध्येच भाई परमानंद यांनी केली होती. त्यांच्यासोबत श्यामजी कृष्ण वर्मा, वि.दा. सावरकर असे अनेक क्रांतिकारक सक्रिय होते. त्यांचे ८ डिसेंबर १९४७ मध्ये निधन झाले. तरुणांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला हिंदू महासभेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात बिलासपूर हिंदू महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जोशी प्रामुख्याने हजर होते.