News Flash

वनकरांच्या उमेदवारीवरून राऊतांची थोरातांवर विरुद्ध नाराजी!

राज्यपाल नियुक्त १२ नावांची शिफारस नुकतीच करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

अनुसूचित जातीच्या नेत्यांच्या बैठकीत पक्षाअंतर्गत खदखद उघड

नागपूर : अनिरुद्ध वनकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर बैठकीतच उघड नाराजी केल्याने पक्षाअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी बोलावलेल्या अनुसूचित जातीच्या नेत्यांच्या बैठकीत राऊत यांनी थोरात यांच्यावर निशाणा साधला. याला कारण ठरले राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या शिफारशीचे. चंद्रपूर येथील अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी देण्यात आली. ते विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते. त्यांना पक्षाने उमेदवारी देताना पक्षातील युवकांचा विचार केला नाही, अशी टीका  राऊत यांनी केली. या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणीती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त १२ नावांची शिफारस नुकतीच करण्यात आली. त्यात काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांचे नाव देण्यात आले. अनिरुद्ध वनकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवारीवरून या बैठकीत आक्षेप नोंदवण्यात आला. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला राज्यात फटका बसला आहे. अशी उमेदवारी देताना याबाबत पक्षात मत जाणून घेण्यात आले नाही. काँग्रेस विरोधात निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, असा आक्षेप राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता घेतला. काही मुद्यावरून मंत्रिमंडळात साथ मिळत नसल्याची भावना देखील नितीन राऊत यांनी व्यक्त केली. टाळेबंदी काळातील १०० युनिटपर्यंत वीज देयक माफ करण्याच्या मुद्याकडे त्यांचा रोख होता. काँग्रेस पक्षाला मिळालेली मंत्रिपदे ही थेट लोकांशी निगडित नाहीत, त्यामुळे संपर्कमंत्र्यांनी जिल्यात जाऊन जनतेशी संपर्क ठेवावा. पक्ष करत असलेले काम, सरकारचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशी चर्चा देखील बैठकीत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीमा कोरेगाव प्रकरण पदोन्नतील आरक्षण या मुद्यांवर देखील  या बैठकीत चर्चा झाली.  मात्र नितीन राऊत यांनी आपण वनकरांच्या मुद्दयावरून बैठकीत कुठलेही भाष्य केले नाही.  हे सर्व मुद्दे इतर लोकांनी उपस्थित केल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:50 am

Web Title: legislative council candidature congress party energy minister dr nitin raut akp 94
Next Stories
1 ४२ दिवसांनंतर बाधितांचा नवीन उच्चांक
2 राज्याच्या स्वतंत्र वन्यजीव धोरणासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
3 लोकजागर : सरकारचाच ‘असहकार’!
Just Now!
X