हिंगण्यातील घटनेत आठ तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

तब्बल आठ तासांचा थरार.. गावकऱ्यांनी अनेकदा अनुभवला, पण शहरातली ही पहिलीच घटना. सीआरपीएफ प्रवेशद्वाराजवळील वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला तब्बल आठ तास परिश्रम करावे लागले. त्याला बेशुद्ध करण्याचे तीन प्रयत्न फसले आणि चौथा प्रयत्न यशस्वी झाल्यावर सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.

हिंगण्यातील लता मंगेशकर रुग्णालयाजवळच्या पोलीस नगरातील  पराग वायस्कर यांच्या घरात बिबट शिरला. स्नानगृहात त्याने ठाण मांडल्याचे दिसताच वायस्कर यांनी दार लावून घेतले आणि वनविभागाला सूचना दिली. वनखात्याचे बचाव पथक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत बिबटय़ाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचे पथक दाखल झाले.

स्नानगृह अडचणीचे असल्याने व त्याला एकच खिडकी असल्याने बिबटय़ाला बेशुद्ध करताना अनेक अडचणी आल्या. बिबट नेमका खिडकीच्या खालीच बसल्याने त्याला ‘ट्रॅक्विलायजिंग गन’ने बेशुद्ध करणे कठीण जात होते. पशुवैद्यक अधिकारी डॉ. गौतम भोजने हे त्याला बेशुद्ध करण्यासाठी खिडकीजवळ गेले तर बिबट देखील खिडकीजवळ उभा राहात होता. पहिले तीन प्रयत्न फसले आणि चौथ्या प्रयत्नात मात्र त्याला बेशुद्ध करण्यात यश आले. डॉ. विनोद धूत यांनी त्यांना सहकार्य केले.  अमरावती बचाव पथकाचे अमोल गावनेर व चमू शहरात असल्याने त्यांच्या‘ट्रँक्विलाईज गन’चा वापर बेशुद्धीकरणासाठी करण्यात आला.

बिबट पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

बिबटय़ाच्या अंगावर जाळी टाकण्यात आली. स्टेचरवरून त्याला पिंजऱ्यापर्यंत आणण्यात आले. सध्या या बिबटय़ाला सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ मध्ये ठेवण्यात आले आहे.

यावेळी प्रादेशिक उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जून, वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते तसेच वनखात्याचे व पोलीस खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

झुडपी जंगलातून आला

ज्या घरात बिबट शिरला ते त्या वस्तीतील अगदी शेवटचे घर असून मागे झुडपी जंगल आहे. बिबट येथूनच वसाहतीत शिरला असावा असा अंदाज आहे. वायस्कर यांच्या आधी हा बिबट दुसऱ्या घरात गेला होता. तेथून भिंतीवरून उडी मारून तो वायस्कर यांच्या घरातील स्नानगृहात शिरला. मोठय़ा हिंमतीने त्यांनी स्नानगृहाचा दरवाजा बंद केला, पण त्याला कडी नसल्याने त्यांनी घरातील सर्व जड सामान दरवाजाला लावून ठेवले. यावेळी चार पोलीस कर्मचारीही त्याच ठिकाणी ठाण मांडून होते. वायस्कर यांनी त्यावेळी हिंमत दाखवली असली तरीही ‘रेस्क्यू ऑपरेशन’ पूर्ण होईपर्यंत ते प्रचंड तणावात होते.

यशस्वी ‘ऑपरेशन’

अतिशय लहान स्नानगृह असल्याने बिबटय़ाला फिरण्यासाठी जागाच नव्हती. प्रत्येक पाऊल उचलण्याआधी आम्ही चर्चा करत होतो. बिबट बसून असल्याने बेशुद्धीकरणासाठी मारलेला प्रत्येक ‘डॉट’ उसळत होता. शेवटी पाईपने बिबटच्या अंगावर पाणी सोडले. तो जसा उभा झाला त्याला ‘डॉट’ मारला आणि तो यशस्वी ठरला. आठ तासाचा अवधी लागला असला तरी बिबटय़ाला कोणतीही इजा न होता, हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’यशस्वी केल्याचा आनंद डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे यांनी व्यक्त केला.