News Flash

बिबटय़ाच्या बछडय़ाला अखेर आई मिळाली!

कळमेश्वर वनपरिक्षेत्रात इटनगोटी गावालगत दिवाकर वडस्कर यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी बिबटय़ाचा बछडा पडला. 

 

कॅमेऱ्याने टिपला मातृत्वाचा हळवा क्षण

आईपासून दुरावलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाची पशुवैद्यकीय अधिकारी व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुश्रूषा केली. दुसरीकडे बछडा दिसत नाही म्हणून आईचा जीव कासावीस झाला होता. अखेर अवघ्या २४ तासांत त्या बछडय़ाला आईची भेट घडवून आणण्यात वनखात्याला यश आले. मादी बिबट आणि तिच्या बछडय़ाचा हा मिलनाचा क्षण त्याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्याने अलगद  टिपला.

कळमेश्वर वनपरिक्षेत्रात इटनगोटी गावालगत दिवाकर वडस्कर यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी बिबटय़ाचा बछडा पडला.  वनपरिक्षेत्रातील अधिकारी अर्चना नौकारकर व त्यांच्या चमूने सहाय्यक वनसंरक्षक पी.डी. पालवे यांच्या नेतृत्वात त्याला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, नागपूरवरून ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल यांच्यासोबत घटनास्थळी पोहचली. त्या बछडय़ावर प्राथमिक उपचार करून नागपूरला हलवण्याची तयारी चालली होती. त्याची आई जवळपास असण्याची शक्यता  होती. त्यामुळे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी त्या बछडय़ाला नागपुरात हलवण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यास सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी  लक्ष ठेवून होते. रात्री त्याला ज्या भागातून आणले, त्याच ठिकाणी त्याला ठेवण्याचे निश्चित झाले. प्लास्टिकच्या एका डब्यात ठेवून त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी मादी बिबट त्याठिकाणी आली. बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर तिने तो प्लास्टिक डबा उघडला. त्यातून बछडा बाहेर येताच, ती त्याला घेऊन गेली. प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, सहाय्यक वनसंरक्षक पी.डी. पालवे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली.

मजुराच्या मागे बिबटय़ा धावला

अंबाझरी जैवविविधता उद्यानात काही दिवसांपूर्वी बिबटय़ाच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. त्यानंतर अजूनही हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आज गुरुवारी सकाळी वासुदेवनगरकडून लिटिलहूडच्या मार्गावर मेट्रोने लावलेल्या वृक्षांमध्ये बिबटय़ाने प्रवेश केला. याठिकाणी काम करणाऱ्या मजुराच्या मागे बिबट धावला. त्याने कसाबसा तेथून पळ काढला. त्यानंतर काम बंद करण्यात आले. याठिकाणी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावण्यासाठी परवानगी मागण्यात आली असून वनखात्याची चमू परिसरात शोधमोहीम राबवत आहे.

मिहानचा वाघ पुन्हा परतीच्या मार्गावर

मिहानमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने पुन्हा एकदा परतीचा मार्ग धरला आहे. चार दिवसांपूर्वी या वाघाने इन्फोसिसच्या मागील झुडपांमध्ये गाय मारली होती. जेसीबीने हा परिसर स्वच्छ करत असताना ही बाब उघडकीस आली. या वाघाच्या पाऊलखुणा ज्या दिशेने तो आला होता, त्या खडकाकडून मोंढय़ाकडे हिंगणा वनक्षेत्राकडे आढळल्या आहेत. कॅमेरा ट्रॅपमध्येही त्याचे छायाचित्र आढळले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 12:19 am

Web Title: leopard son mother heart touching sean akp 94
टॅग : Leopard
Next Stories
1  समाजमत : मराठा समाजासाठी स्वतंत्रविकास महामंडळ स्थापन करावे
2 लोणार ‘स्टोन सर्कल’ अजूनही वारसा स्थळ दर्जाच्या प्रतीक्षेत
3 ‘महाज्योती’ला निधीची प्रतीक्षा
Just Now!
X