14 August 2020

News Flash

बिबटय़ांनाही आता ‘रेडिओ कॉलर’

मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सुरुवात

संग्रहित छायाचित्र

राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि माणसांचा तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट आणि माणसांचा संघर्ष नित्याची बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून वाघांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला जात आहे. त्याच धर्तीवर आता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्या सहकार्याने बिबटय़ांना जीपीएस-जीएसएम कॉलर लावून मानव-बिबट सहसंबंधांवर प्रकाश टाकला जाणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने दूरमिती पद्धतीने होणाऱ्या या अभ्यासासाठी  १४ जुलैला मंजुरी दिली आहे. त्याची सुरुवात बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येतील. बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची एकमध्ये बिबट येत असल्याने त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाच्या परवानगीची आवश्यकता होती. मागील आठवडय़ात ही परवानगी मिळाली असून लवकरच या अभ्यासाला सुरुवात होणार आहे. याअंतर्गत राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या आणि शहराच्या वेशीवर वावर असणाऱ्या पाच बिबटय़ांना (तीन मादी व दोन नर ) रेडिओ कॉलर लावण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी ६२ लाख रुपयांचा खर्च येणार असून ४० लाख रुपये राज्याच्या वनखात्याकडून तर उर्वरित रक्कम वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्याकडून दिली जाणार आहे. निधीच्या उपलब्धतेनंतर परदेशातून या रेडिओकॉलर मागवण्यात येतील. जानेवारी २०२१ पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

*  मानव व बिबटय़ातील परस्परसंबंध व एकमेकांशी ते कसे जुळवून घेतात हे पाहणे.

* मुंबईतील बिबट उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर अभयारण्यात कसे जातात ते पाहणे.

* संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट तेथील जागा व वेळेचा वापर कशाप्रकारे करतात ते समजून घेणे.

* अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे या क्षेत्रातील बिबटय़ांचा वावर व संघर्ष निवारणसंबंधी शिफारशी सुचवणे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल विभागाने याला मान्यता दिली याचा अनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या लाजाळू प्राण्याबाबत अमूल्य माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

– सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)

आधीच्या प्रकल्पातून ग्रामीण भागात बिबट माणसांसोबत कसे राहतात, याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. पण इतकी घनदाट मानववस्ती असलेल्या भागात आणि माणसांच्या इतक्या जवळ बिबट कसे राहतात हे जाणून घेण्यासाठीचा हा पहिलाच अभ्यास असेल.

– डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव संवर्धन संस्था, भारत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:02 am

Web Title: leopards now have radio callers abn 97
Next Stories
1 संत्री, मोसंबी उत्पादकांसाठी उन्नत तंत्रज्ञान प्रकल्पाचा प्रस्ताव
2 New Education Policy 2020 : पूर्वप्राथमिक शिक्षण कायद्याच्या कक्षेत
3 लोकजागर : बिन पैशांचे ‘नाटक’!
Just Now!
X