गेल्या दोन वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे होणाऱ्या नाटय़संमेलनाच्या स्थळांमध्ये मुख्यमंत्री रहिवासी असलेल्या नागपूरचा प्रस्ताव असला तरी स्थानिक कलावंतांचे आणि कार्यकारिणीतील आपसातील वाद आणि हेवेदावे बघता यावेळीही याच कारणावरून नागपूरला संमेलन नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सातारा, जळगाव आणि ठाणे या शहराचा संमेलनासाठी विचार करण्यात आला असून या तीनपैकी एका स्थळाची निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी मुंबईला झाली, त्यात संमेलनासाठी आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. संमेलन स्थळासाठी यावेळी नागपूरसह उस्मानाबाद, जळगाव, सातारा, सांगली आणि ठाण्याचा प्रस्ताव नियामक मंडळासमोर आला, मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरबाबत यावेळी विचार करण्यात आला नाही. दोन वर्षांआधी नागपूरची निवड जवळपास निश्चित झाली असताना स्थानिक पदाधिकारी आणि कलावंतांमधील वादामुळे नागपूरला ठरलेले संमेलन ऐनवेळी पंढरपूरला नेण्यात आले आणि नागपूरचे नाव मागे पडले. गेल्यावर्षी बेळगावमध्ये संमेलन झाल्यानंतर यावेळी तरी संमेलन होईल, अशी आशा होती आणि तसे आश्वासन मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाने दिले होते, मात्र रविवारी मुंबईला झालेल्या बैठकीत नागपूरच्या प्रस्तावावर चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर शाखेच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि अन्य ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांमध्ये सुरू असलेले हेवेदावे मध्यवर्ती शाखेत पोहोचल्यामुळे संमेलन स्थळाचा निर्णय बैठकीत होऊ शकला नाही. नियामक मंडळावर नागपूरचे चार सदस्य होते त्यात उपाध्यक्ष म्हणून प्रमोद भुसारी, किशोर आयलवार, दिलीप देवरणकर आणि पराग लुले यांचा समावेश आहे. प्रथमच मध्यवर्ती शाखेत नागपूरचे चार सदस्य असताना गेल्या तीन वर्षांपासून संमेलनासाठी हुलकावणी दिली जात आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ शाखेची एक शाखा असताना गेल्यावर्षी कलावंतांमधील हेवेदावे बघता दुसरी शाखा सुरू करण्यात आली आणि मध्यवर्ती शाखेने त्याला मान्यता दिली. त्यामुळे शहरात दोन नाटय़ संस्था काम करीत असून प्रत्येकाचे एकेमकांशी वाद असल्यामुळे एकमेकांचे पाय खेचण्याचे काम सुरू आहे. नागपूरची नाटय़ शाखा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सोडला तर वर्षभर फारसी सक्रिय दिसत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर जबाबदारी ढकलत असताना आरोप-प्रत्यारोप केले जातात. मुंबईला झालेल्या बैठकीत त्याचाच परिणाम म्हणून की काय मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी यांना उपाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले, तर नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ कलावंत शहरात असताना ते नाटय़ परिषदेच्या राजकारणापासून दूर आहेत. नवोदित कलावंत परिषदेमघ्ये सक्रिय होऊ पाहत असताना काही स्थानिक पदाधिकारी त्यांना संधी देत नसल्याचा आरोप होत आहे. नागपुरातील सांस्कृतिक क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी काही ज्येष्ठ कलावंत प्रयत्न करीत असले तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अशा सर्व परिस्थितीत नाटय़संमेलन नागपूरला कसे करावे, असा प्रश्न मध्यवर्ती शाखेसमोर निर्माण झाल्यामुळे नागपूरचा प्रस्ताव यावेळी बारगळला असल्याचे बोलले जात आहे.