जगभरातच अतिसंकटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट

जगभरातच अतिसंकटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट तणमोर तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा शहरात आढळला. सध्या हा तणमोर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आहे. लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर काही नागरिकांना मांजरीपासून बचावाचा प्रयत्न करत असलेला तणमोर दिसला. त्यांनी लगेच पक्षीमित्र पारशी अमरोलीवाला याला माहिती दिली. अमरोलीवाला यांनी त्याची छायाचित्रे काढून पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे व विनीत अरोरा यांच्याकडे पाठवले. त्यांनी लगेच ही तणमोर पक्ष्याची मादी असल्यावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी तातडीने मैदानावर जाऊन पक्ष्याला ताब्यात घेतले आणि सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आणले. पक्ष्याला फारशी जखम नसली तरीही मांजरीच्या हल्ल्यामुळे त्याला धक्का बसला आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी तसेच उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जून व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. पक्षी अभ्यासक संजय नाफडे व त्यांच्या पत्नी प्रज्ञा नाफडे यांना २५ एप्रिल २०१५ ला मिहान परिसरात हा पक्षी दिसला होता. त्याचे छायाचित्र टिपण्यात त्यांना यश आले होते. तत्पूर्वी २००२-२००३ मध्ये तो शहराच्या परिसरात अवघ्या काही सेकंदाकरिता दिसून आला. मात्र, छायाचित्र व कागदोपत्री त्याची नोंद करण्यात आली नव्हती. १९८२ साली आयोजित महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी हा तणमोर आणला होता. त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. एका शिकाऱ्याकडून त्यांनी तणमोराला वाचवले होते.

वीज केंद्र, खाण परिसरात वास्तव्य

महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात तणमोरचे अस्तित्व आहे. माळरानाचे वैभव असलेला माळढोक आणि तणमोराची देशभरातील संख्या कमी होत आहे. कुरण, माळरान, गवताळ प्रदेशाचे आकुंचन, शिकार, चराई या त्यामागील कारणे आहेत. मात्र, या पक्ष्याचे वैशिष्ट म्हणजे वीज केंद्र, खाणी अशा परिसरात हा पक्षी स्वत:ला अधिक सुरक्षित समजत असल्याचे आजवरच्या पाहणीत दिसून आले आहे. ‘लिटील रन ऑफ कच्छ’मध्ये वर्षांतून दहा ते बाराच्या संख्येत आढळणारे तणमोर आता जवळजवळ नाहीसे झाले आहेत. महाराष्ट्रात अकोला, मूर्तिजापूर, वाशीम, खामगाव या परिसरात हा पक्षी दिसून येतो.

तणमोर हा मुळात जमिनीवर राहणारा पक्षी आहे, तो फार दूर उडू शकत नाही. पक्ष्यांचा हा प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे या मादी तणमोराला देखील लवकरात लवकर सामान्य स्थितीत आणून नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्यक आहे, असे मत पक्षी अभ्यासक संजय नाफडे यांनी व्यक्त केले.