नितीन गडकरी यांचा निर्धार

नागपूर : शाश्वत जीवनमान उंचावण्यासाठी निरोगी वातावरणाची आवश्यकता आहे. याकरिता सीएनजी, जैवइंधनावर चालणारी वाहने शहरात आणून व आवश्यक वृक्षारोपण करून उपराजधानीला जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करू, असा  निर्धार  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हवालदार किसन गंगाराम इंगोले हे शहीद झाले होते. ते नागपूर सीआरपीएफ समूहाचे होते. त्यांच्या स्मृतीत परिसरात को-ऑपरेटिव्ह धान्य दुकान सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यानंतर त्यांनी समूहात प्रशिक्षण घेणाऱ्या ४१८ जवानांना मार्गदर्शन केले.  ते म्हणाले की, सैनिकांचा चांगले अन्नधान्य उपलब्ध व्हायला हवे. शिवाय सीआरपीएफचा परिसर अतिशय सुंदर असून हिरवे नागपूरची संकल्पना सीआरपीएफने टिकवली आहे. उपराजधानीला जगातील हिरव्या शहरांत दाखल करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्याकरिता ‘ग्रीन नागपूर’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. या संस्थेते नीरीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपासून ते विविध विभागातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ग्रीन नागपूरकडून शहरातील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास करण्यात येत असून ते कमी करण्यासाठी सीएनजी, जैवइंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. महापालिकेच्या ८० बसगाडय़ा सीएनजीवर आहेत. उर्वरित ३७० बसगाडय़ाही सीएनजीवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शहरातील इतर वाहने इलेक्ट्रिक व जैव इंधनावर येतील व प्रदूषणाचा स्तर कमी होईल. त्यानंतर उरलेल्या प्रदूषणाच्या पातळीनुसार आवश्यक वृक्षारोपण करण्यात येईल. या पर्यायांमुळे उपराजधानीचे शाश्वत जीवनमान उंचावेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार समीर मेघे आणि सीआरपीएफ नागपूर समूहाचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक प्रशांत जांभुळकर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी परिसरात वृक्षारोपणही केले.

जांभुळकर यांनी प्रास्ताविक करताना लोकमान्य टिळक मेट्रो स्थानकाला लोकमान्य सीआरपीएफचे नाव जोडण्यात यावे आणि महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनांना पथकर माफ करण्याची विनंती केली. नितीन गडकरी यांनी या दोन्ही बाबींवर विचार करण्याची ग्वाही दिली.

गडकरींच्या हस्ते आठ रुग्णवाहिका वितरित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सीएसआर निधीतून आठ सामाजिक संस्थांना सर्व सुविधांनी सुसज्जित अशा आठ रुग्णवाहिका  वितरित केल्या. याप्रसंगी अंजनगाव सुर्जीच्या मठाचे जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. या आठ रुग्णावाहिका एमजी हेक्टर या कंपनीच्या आहेत. वनवासी सेवा समिुती यांना एकलव्यय आश्रम शाळा , जळगाव जामोद, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती अकोला, संस्कृती संवर्धन मंडळ अवधूतवाडी, यवतमाळ, लोकमंगल फाऊंडेशन, जनजाती चेतना समिती गोंदिया, जनजाती विकास समिती गडचिरोली, भटके विमुक्त कल्याणकारी संस्था भंडारा, मिशन फॉर डेव्हलपमेंट अॅण्ड डिव्हिनिटी ट्रस्ट नागपूर या संस्थाना या रुग्णवाहिका देण्यात आल्या.