कंत्राटी डॉक्टर महिलेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र; कर्तव्य बजाविताना अख्ख्या कुटुंबाला करोनाने घेरले

नागपूर :  मला दोन छोटे बाळ आहेत. घरी वृद्ध आईवडील आहेत. करोना चाचणी केंद्रात काम करताना सहकारी मदतीला हवी, अशी मागणी केली मात्र ती पूर्ण करण्यात आली नाही. अखेर मलाच करोना झाला. माझ्यासोबत कुटुंबालाही झाला. मी करोनाग्रस्त आहे म्हणून माझ्या मुलीला रुग्णालयात भरती करायला कुणी तयार नव्हते. कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना करोना झाला आहे माझा गुन्हा आहे का? साहेब, उद्या मला काही झाले तर तुम्हाला लगेच दुसरा डॉक्टर मिळेल, पण माझ्या मुलांना त्यांची आई कुठून परत देणार, असा हृदय हेलावून टाकणारा सवाल  एका कंत्राटी डॉक्टर महिलेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत  डॉ. अश्विनी भुजाडे आपली सेवा देत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जे पत्र लिहिले त्यात त्या म्हणतात, माझे कार्यक्षेत्र हे नागपूर महापालिका आहे पण, करोनाचे वाढते प्रमाण बघता आणि मनुष्यबळ कमतरतेमुळे अधिकाऱ्यांनी केवळ मौखिक आदेश दिल्याने मी  बुटीबोरी येथील तपासणी केंद्रावर  रुजू झाले. त्यानंतर बोरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथील अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम केले. पण मी मशीन नाही. माझ्या कामालाही  मर्यादा आहेत. मला दोन छोटे बाळ आहेत. घरी आईवडील आहेत. चाचणी केंद्रात काम करताना माझ्यासोबत वैद्यकीय अधिकारी (एमओ) मदतीला हवी अशी मागणी केली मात्र ती पूर्ण करण्यात आली नाही. माझी प्रकृती बिघडल्याचे तेथील प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले पण त्यांना विश्वास बसला नाही.

औषध घेत मी काम करत होते. अखेर मीच करोनाग्रस्त झाले.  दिवसभर फिरल्यानंतर एकदाचे रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर माझे आई बाबा करोनाबाधित झाले. त्यांची प्रकृती ठीक नाही. माझ्या मुलीला ताप आला. पण तिला कुणी रुग्णालयात भरती करत नव्हते, अशी खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

तुमच्या नावाच्या धमक्या मिळतात

नोकरी करत असताना माझी मानसिक व शारीरिक हानी झाली आहे ती खूप मोठी आहे. मला खूप विवश वाटत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना आमचा कुणीच विचार करत नाही. प्रशासनाकडून  काहीच सुरक्षा नाही किंवा आर्थिक मदतही नाही. आजारी असताना कार्यालयातून साधी विचारपूस करण्यात आली नाही. आम्ही काही करू शकत नाही असेच उत्तर आम्हाला मिळत असते. तुमच्या नावाच्या धमक्या आम्हाला मिळतात. तुम्हाला हे कळावे की काम केल्यावर काय फळ मिळते त्यामुळे हे पत्र लिहिले असून मला समजून घ्याल, अशी अपेक्षा डॉ. भुजाडे यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जी कामे केली जातात ती आरोग्य उपसंचालक किंवा सिव्हिल सर्जन यांच्यामार्फत होत असतात. माझ्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले असले तरी ते आरोग्य उपसंचालक किंवा सिव्हिल सर्जन यांना पाठवून या पत्राची चौकशी करण्याबाबत सांगण्यात येईल.

– योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद.