12 November 2019

News Flash

‘डिलिव्हरी बॉय’ला परवाना सक्ती

एफडीएकडे अद्याप एकही अर्ज नाही; ऑनलाईन अन्न पुरवठादार कंपन्यांवर कारवाई कधी?

(संग्रहित छायाचित्र)

एफडीएकडे अद्याप एकही अर्ज नाही; ऑनलाईन अन्न पुरवठादार कंपन्यांवर कारवाई कधी?

महेश बोकडे, नागपूर

उपराजधानीत मोबाईल अ‍ॅपवरून अन्न मागवणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरवठादार कंपन्यांतील डिलेव्हरी बॉयलाही शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाचा (एफडीए) परवाना बंधनकारक केला आहे. परंतु अद्याप शहरात एकाही डिलेव्हरी बॉयच्या परवान्यासाठी अर्ज एफडीएकडे आला नाही.

ऑनलाईन फूड डिलेव्हरीचा व्यवसाय सर्वत्र तेजीत आहे. सध्या शहरात उबेर इट्स, झोमॅटो, स्विगी या तीन प्रमुख मोठय़ा कंपन्यांकडून खाद्य पुरवठा केला जातो. या व्यवसायामुळे शहरात मोठय़ा संख्येने तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. मध्यंतरी कंपन्यांकडे एफडीएचा परवाना नसलेल्या हॉटेलमधूनही अन्नाचा पुरवठा होत असल्याचे पुढे आले होते. त्यावरून एफडीएने या कंपन्यांना नोटीस बजावत त्यांना अन्न पुरवणाऱ्या हॉटेलसोबत करार करून त्यांचेही परवाने एफडीएकडे सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, नुकतेच एफडीएच्या नियमात काही बदल झाले. त्यानुसार आता ग्राहकांना खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलेव्हरी बॉयलाही एफडीएचा परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. परंतु नागपुरात एकाही कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडून अद्यापही परवान्यासाठी अर्ज आले नाही, अशी माहिती मिळाली.

शहरात १,५०० डिलिव्हरी बॉय

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या शहरात ऑनलाईन खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे सुमारे १ हजार ५०० डिलेव्हरी बॉय काम करीत आहेत. सर्वाधिक डिलेव्हरी बॉय हे झोमॅटो या कंपनीकडे आहेत.

‘‘प्रत्येक डिलेव्हरी बॉयने परवाना घेतल्यास नागरिकांना सुरक्षित अन्न पुरवठा होऊ शकेल. त्यासाठी एफडीए प्रशासन खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पत्र पाठवून परवाने घेण्याच्या सूचना करणार आहे. त्यानंतरही कुणी परवाना न घेतल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल.’’

– मिलिंद देशपांडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, नागपूर.

First Published on April 2, 2019 12:26 am

Web Title: license required for delivery boy