‘अनफिट’ बसच्या अपघातात कुणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण?

नागपूर जिल्ह्य़ातील शहर आणि ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी ‘फिटनेस’ तपासणी न केल्याने सुमारे ९०० स्कूलबसचे परवाने चार महिन्यांकरिता निलंबित केले आहे, परंतु त्यानंतरही शहरात बहुतांश परवाना निलंबित केलेल्या स्कूलबसेसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटना करीत आहेत. या प्रकाराने ‘फिट’ नसलेल्या बसचा अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव गेल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूर शहरात १,९१८ तर ग्रामीण भागात सुमारे १ हजार २०० वर ‘स्कूलबस, स्कूलव्हॅन्स’मध्ये लाखो शालेय विद्यार्थ्यांची ने-आण होते. या वाहनांचे वाढते अपघात बघता काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने कडक कायदे केले. अंमलबजावणीकरिता स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी झाली. त्यानुसार स्कूलबसमध्ये अग्निशमन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यात काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपत्कालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या दांडा, विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही अनेक बदलांचा समावेश होता.

या दुरुस्तीकडे बहुतांश चालकांनी दुर्लक्ष केले. राज्याच्या परिवहन आयुक्तांसह सगळ्याच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्कूलबस चालकांना विविध नोटीस पाठवत वेळोवेळी फिटनेस तपासणीचे आव्हानही केले. त्यानंतरही चालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता कडक कारवाई सुरू केली होती. त्यानुसार नागपूर शहरातील २९६ स्कूलबसचे परवाने ४ महिन्यांकरिता निलंबित तर पूर्व नागपुरातील तीनशेवर स्कूलबस चालकांना निलंबनाची अंतिम नोटीस देण्यात आली होती.

 

नागपूर जिल्ह्य़ातील ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागानेही ६०० स्कूलबस व व्हॅनचे परवाने निलंबित केले होते. या कारवाईने सुरुवातीला काही प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला असला तरी नंतर त्रास होत नसल्याचे चित्र होते. या कारवाईनंतर काही स्कूलबस चालकांनी विविध दंड व नियमानुसार प्रक्रिया पार पाडून ‘फिटनेस’ प्रमाणपत्र करून घेतले, परंतु त्यानंतरही जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर परवाना निलंबित असलेल्या स्कूलबस आहेत. तेव्हा ‘फिटनेस’ प्रमाणपत्र नसलेल्या व परवाना निलंबित असलेल्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने त्याला अभय कुणाचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

 

शहरातील स्कूलबसची स्थिती

कार्यालयाचे नाव      नोंदणीकृत    तपासलेल्या    फिटनेस नसलेल्या

नागपूर ग्रा.                     ६००              १२००                  ६००
(अंदाजित)

नागपूर शहर                    ६७५         ३७९                      २९६

पूर्व नागपूर                      ८६४          ५२२                        ३४२

वर्धा                                     ३७९      २५५                १३४