News Flash

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकरास जन्मठेप

तिथे दोघांमध्ये वाद झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र

गडचिरोली : प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जयदेव निरंजन सरदार (२२) रा. कोपरअली, ता. मुलचेरा असे दोषी युवकाचे नाव आहे.

११ जून २०२० रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास आरोपी जयदेव सरदार हा त्यांच्या मित्रांसह मोटारसायकलने पुल्लीगुडम-चंदनवेली येथे गेला होता. दोघांनीही फोन करून आपापल्या प्रेयसींना एका शेतात बोलावले. दोघीही तेथे गेल्या. त्यानंतर जयदेवचा मित्र व त्याची प्रेयसी एका झोपडीत थांबले. तर जयदेव हा प्रेयसीला घेऊन जंगलात गेला. तिथे दोघांमध्ये वाद झाला. यावेळी प्रेयसीला एका विहिरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला. तिला वाचवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी जयदेवने त्याचा मित्र व प्रेयसीला दिली. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी मृत मुलीच्या वडिलांना काहीच सांगितले नाही.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मृत मुलीचे वडील कोपरअली येथे जात असताना एका शेतातील विहिरीजवळ त्यांच्या मुलीच्या चपला व हातातील कडा दिसल्या. त्यानंतर वडिलांनी जयदेवचा मित्र व त्याच्या प्रेयसीला विचारणा केली असता त्यांनी हकीकत सांगितली. मृत मुलीच्या वडिलांनी काही नागरिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जयदेव सरदार याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी केला. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारा पक्षातर्फे अनिल प्रधान यांनी बाजू मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:01 am

Web Title: life imprisonment murder of his beloved akp 94
Next Stories
1 खासगीत रेमडेसिवीर नाही, शासकीय रुग्णालयात दाखल करा
2 बंदी झुगारून व्यापाऱ्यांचा जमाव!
3 राजकीय वरदहस्तामुळे सफेलकर ‘प्रतिष्ठित’ झाला!   
Just Now!
X