पत्नीच्यात खुनात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी नागपूर खुल्या कारागृहातून पसार झाला आहे. प्रभात मंडल ऊर्फ शामल दिनेश बिस्वास (४१) रा. पोरदाह, बेडबरी (उत्तर चोवीस परगना, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृह चर्चेत आले आहे.

माधुरी शामल बिस्वास असे मृत महिलेचे नाव आहे. २४ एप्रिल २००२ ला शामल आणि माधुरीचा विवाह झाला होता. लग्नानंतर तीन ते चार महिन्यांनी शामल हा मुंबई येथे बांधकाम व्यवसायात काम करण्यासाठी निघून आला. त्यावेळी माधुरी ही मूळ गावीच राहायची. त्यानंतर अनेक वर्षांनी १ जुलै २००५ मध्ये तो माधुरीला घेऊन मुंबईत दाखल झाला. त्यावेळी तो सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘मानव सेवा संघ’ इमारतीच्या बांधकामावर काम करायचा. बांधकाम सुरू असताना इमारतीच्या पहिल्या माळयावर एका खोलीत ते राहात होते. ७ जुलैला सकाळी ९ वाजता तो पत्नीसह बाहेर गेला होता. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता परतला. त्या रात्री माधुरीने मासोळीचा स्वयंपाक केला होता. काही मित्रांसोबत शामल हा रात्री उशिरापर्यंत पत्ते खेळत होता. रात्री मित्र घरून निघून गेले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याने पत्नीचा हातपाय बांधून गळा आवळून खून केला आणि घरातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेजाऱ्याने कामावर जाण्यासाठी दूरध्वनी केला असता आरोपीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने घरी भेट दिली, तेव्हाची त्याची पत्नी मृतावस्थेत होती आणि तिच्या अंगावर कपडेही नव्हते.

सायन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयासमक्ष झाली आणि १७ मार्च २००७ ला सत्र न्यायाधीशाने त्याला जन्मठेप व ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगताना त्याचा स्वभाव चांगला असल्याने त्याला ३१ जानेवारी २०१६ नागपुरातील खुल्या कारागृहात पाठविण्यात आले. तेव्हापासून तो खुल्या कारागृहात आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता इतर अकरा कैद्यांसह त्यालाही पोलीस उपमहानिरीक्षक बंगला परिसरात काम करण्यासाठी बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक तुरुंग रक्षक कार्यरत होता. दुपारी १ वाजता जेवण केल्यानंतर शामल हा सुरक्षा रक्षकाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कधी सुटी घेतली नाही, ना नातेवाईकांची भेट!

पत्नीच्या खुनात अटक झाली आणि शिक्षा ठोठावल्यापासून त्याला कारागृहात एकही नातेवाईक भेटला नाही. शिवाय आजवर त्याने एकही सुटीही घेतलेली नाही. उच्च न्यायालयात त्याने एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता.

कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून २०१४ मध्ये पाच कुख्यात पळाले होते. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचे अंकेक्षण करण्यात आले. वर्षभरापूर्वी अशाचप्रकारे खुल्या कारागृहातून गडचिरोली जिल्ह्य़ातील एक कैदी पळून गेला होता. त्यानंतर आता पुन्हा खुनासारख्या गंभीर गुन्ह्य़ातील जन्मठेपेचा कैदी पळाल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.