वर्धा येथील सेलू तालुक्यात मुसळधार पावसात वीजा कडाडत असताना मोबाइल वापरणं एका शेतकऱ्याला महागात पडलं आहे. शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला असून दोघे जखमी झाले आहेत. सेलू तालुक्यातील वडगाव कला येथे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु होता. सुभाष संतोष बोबडे (७०) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तर जखमी झालेल्या शेतकऱ्यांची नावे अशोक बाबूलाल (४०) आणि अनिल गुलाबराव भलावि (३५) अशी आहेत.

सुभाष बोबडे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. यावेळी वीज कोसळली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुभाष बोबडे यांच्यासोबत असणाऱ्या अशोक बाबूलाल आणि अनिल यांनी वीज पडली तेव्हा ते मोबाइल वापरत होते अशी माहिती दिली आहे. विजा कडाडत असताना मोबाइलचा वापर करणे सुभाष बोबडे यांच्या अंगलट आले असं त्यांनी सांगितलं आहे.

अशोक बाबूलाल आणि अनिल गुलाबराव भलावि यांना सेलू येथे शासकीय रुग्णालयात आणले असता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अशोक बाबूलाल यांची परिस्थिती गंभीर असून अनिल गुलाबराव भलावी यांची प्रकृती स्थिर आहे. सदर घटनेची नोंद तलाठी तसेच तहसीलदार यांनी घेतली आहे.