05 March 2021

News Flash

औद्योगिक भेटीसाठी विद्यार्थ्यांना मर्यादित वाव

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्यावतीने अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ‘औद्योगिक भेट’ सक्तीची करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती तिरपुडे

मोठे उद्योग नसल्याने अडचण

विदर्भातील प्रमुख उद्योग आणि त्यावर आधारित लघुउद्योगांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना ‘औद्योगिक भेटी’साठी फार मर्यादित वाव आहे. त्यामुळे त्याच त्या कंपन्यांना भेट देण्याशिवाय महाविद्यालयांनाही पर्याय नाही.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्यावतीने अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ‘औद्योगिक भेट’ सक्तीची करण्यात आली आहे. तो एक अभ्यासक्रमाचाच भाग असून त्याला गुणही दिले जातात. त्यामुळे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना घेऊन एखाद्या उद्योगाला भेट द्यावी लागते. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल शाखेच्या विद्यार्थ्यांना त्याच त्या कंपन्यांना भेट द्यावी लागते. बुटीबोरी वा  हिंगण्यातील  महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, दिनशॉ, मिराज होंडा, केईसी यासारख्या कंपन्यांबरोबर भंडाऱ्याची अशोक ले-लँड किंवा सनफ्लॅग या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत.

तसेच चंद्रपुरात थर्मल पावर स्टेशनमध्येही इलेक्टिकल्स अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक भेट देणे शक्य होते. मात्र, महविद्यालयांची संख्या आणि त्यांच्यातील अभ्यासक्रमांचा विचार केल्यास नागपुरातही फार वाव नाही. त्यामुळे त्याच त्या कंपन्यांना भेट देऊन औद्योगिक भेटीचे सोपस्कार उरकले जातात, अशी खंत काही प्राचार्यानी व्यक्त केली आहे. नागपूरला तरी बरी स्थिती आहे. मात्र, गडचिरोली, अमरावती, चंद्रपुरात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फारच अल्प वाव आहे.

आपल्याकडे अगदी अलीकडे टाटा एरोनॉटिक्स लि. किंवा सिएट टायर्स सारख्या मुख्य कंपन्या आल्या आहेत.  जमशेदपूर, मुंबई, पुण्याला  ‘मदर इंडस्ट्रिज’आहेत. एक मोठा उद्योग सुरू झाला तर त्याला पूरक इतर उद्योग येतात, असे चित्र नागपुरात किंवा विदर्भात नाही.

‘‘उद्योग जरी मर्यादित असले तरी विद्यार्थी बदलत असतात. त्यामुळे एक उत्साह असतोच. जास्तीत जास्त नागपुरातील कंपन्यांना भेट देण्याचा प्रयत्न असतो, तर ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी भंडाऱ्याला अशोक ले- लँड किंवा सनफ्लॅगलाही भेट द्यावी लागते. चंद्रपूर, खापरखेडापर्यंत  विद्यार्थ्यांना घेऊन जातो. अजून कंपन्या असतील तर त्यांना वाव जास्त मिळू शकतो. साधारणत: ९० टक्के कंपन्या, उद्योग महाविद्यालयांना नकार देत नाहीत. त्यांचे आधी काही नियोजन असेल तरच १० टक्के प्रकरणात ते नकार कळवतात. आपल्याकडे आता संरक्षण क्षेत्राची वाढ होत आहे. ’’

– डॉ. जी.के. आवारी, ऑटोमोबाईल प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:36 am

Web Title: limited scope for students to get an industrial visit
Next Stories
1 अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
2 दुष्काळामुळे नापिकी, शेतकऱ्यांची आत्महत्या
3 युतीसाठी आग्रह धरणे लाचारी नव्हे
Just Now!
X