रामटेकचे पोलीस निरीक्षक निलंबित, एक कर्मचारी बडतर्फ

एरवी अवैध धंद्यांना चाप लावण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, पोलीस यात सहभागी होत असतील, तर त्याचे काय परिणाम होतात, याचा विचारही करता येऊ शकत नाही. अशीच घटना नागपूर ग्रामीण पोलीस दलांतर्गत उघडकीस आली असून पोलीस वाहनातून पोलीस कर्मचारीच दारूची तस्करी करताना सापडला. ही खळबळजनक घटना चंद्रपूरच्या पोलिसांनी उघडकीस आणली असून त्यानंतर नागपूर ग्रामीणमधील रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले. तर नागपूरवरून चंद्रपुरात दारूची तस्करी करणाऱ्या नायक पोलीस शिपायाला बडतर्फ करण्यात आले.

सचिन मेश्राम असे दारू तस्करी प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. तर योगेश पारधी असे रामटेकचे निलंबित पोलीस निरीक्षक आहेत. रामटेक विभागाकरिता आरोपी, पोलीस कर्मचारी व आवश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी एक मोठे वाहन आहे. हे वाहन रामटेक पोलीस निरीक्षकांच्या नियंत्रणात असून आवश्यकतेनुसार ते विभागातील पोलीस ठाण्यांना उपलब्ध करून दिले जाते. त्या वाहनावर सचिन मेश्राम हा चालक आहे. १५ मार्चला चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दारू तस्करांविरुद्ध एक कारवाई केली. त्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता ही दारू नागपुरातून एका पोलीस विभागाच्या वाहनातून आणण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चौकशी केली असता त्या रात्रीला संबंधित वाहन पोलीस ठाण्यात नव्हते. त्यावेळी वाहनचालक सचिन मेश्राम हा दारू घेऊन चंद्रपूरला गेला होता, हे स्पष्ट झाले. विभागीय चौकशी करून नागपूर पोलिसांनी मेश्राम याला बडतर्फ केले. तर पोलीस ठाण्यातील वाहनाच्या नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाचे जीपीएस बंद

पोलीस वाहनांना जीपीए बसवण्यात आले आहे. जिल्ह्य़ात प्रत्येक विभाग व पोलीस ठाण्याकरिता अनेक वाहने देण्यात आली आहेत. त्यापैकी ३ वाहनांचे जीपीएस काही दिवसांपासून बंद आहे. त्यापैकी सचिन मेश्रामच्या हाती असलेले वाहन एक आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून सर्व पोलीस वाहनांची आता चौकशी करण्यात येत आहे.