22 April 2019

News Flash

लाल कोबीपासून स्वस्त दरात लिटमस पेपरची निर्मिती

रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींचे संशोधन

|| ज्योती तिरपुडे-खोब्रागडे

रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींचे संशोधन

रोजच्या जगण्यात उपयुक्त लाल कोबी या भाजीपासून विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक आणि स्वस्त दराचे  लिटमस पेपर (पावर ऑफ हायड्रोजन) तयार केले आहेत. ऐश्वर्या म्हैसकर आणि ज्ञानेश्वरी लोंढे या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हे संशोधन सादर केले आहेत. ज्या खाद्यपदार्थामध्ये ‘अ‍ॅन्थोसायनिन’ (पिगमेंट) हा रंग आणणारा घटक आहे. त्यापासून पी.एच. काढता येतो.

‘अ‍ॅसिडीटी’ हा नेहमीच्या ऐकिवातील शब्द. रोजच्या जगण्यात आणि मानवी शरीरातही आम्ल आणि आम्लारी गुणधर्म आहेत. तसेच ते फळात, जमिनीतही आहेत. पालेभाज्या, फळभाज्या, फळे जे जमिनीतून उत्पन्न होतात. त्यांच्यात आम्ल आणि आम्लारी हे गुणधर्म असतातच. अर्थात त्याचे प्रमाण कमी जास्त असते. या प्रमाणावरूनच मूलद्रव्याचे, पदार्थाचे वेगळेपण समजते. ऐश्वर्या आणि ज्ञानेश्वरी यांनी लाल कोबीतील रंगद्रव्याचे महत्त्व ओळखून त्यापासून पीएच पेपर तयार केले. एकप्रकारची वनस्पती (अल्गी) आणि बुरशी पासून कोणताही द्रवपदार्थ अल्कली (अ‍ॅसिडिक) की आम्लारी (बेसिक) हे ओळखण्यासाठी पीएच चाचणी केली जाते.

रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम म्हणाल्या, विद्यार्थिनींनी फार मेहनतीने हा पी.एच. पेपर तयार केले असून वेगवेगळ्या व्यासपीठावर त्या सादर करीत आहेत. लाल कोबीप्रमाणेच इतरही फळे स्वस्त असतात. अगदी शालेय जीवनापासून मुलांना लिटमस पेपर करणे शक्य होईल. लिटमस पेपर एकप्रकारे आम्ल किंवा आम्लारी ओळखणारा सूचक (इंडिकेटर) आहे. विद्यार्थी देखील लाल कोबीपासून तो बनवू शकतात. शिवाय हाताळायलाही सोपे आहे.

पी.एच. म्हणजे ‘पावर ऑफ हायड्रोजन’. एखाद्या द्रवपदार्थात  हायड्रोजन वेगळा करण्याची ताकद असते. हायड्रोजन जास्त प्रमाणात वेगळा करण्याची ताकद असणारे ‘आम्ल’गुणधर्माचे असतात तर कमी हायड्रोजन ज्यातून निघत असतील, त्यात आम्लारी गुण असतात. रोजच्याही जगण्यात आम्ल आणि आम्लारी गुणांशी आपला संबंध येत असतो. साधारणत: लाल रंगद्रव्य चेरी, जांभळ्या रंगाचा गुलाब, द्राक्ष किंवा वांगी यामध्येही ‘अ‍ॅन्थोसायनिन’ हा रंगद्रव्य आहे. त्यापासूनही लिटमस बनवला जाऊ शकतो.     – ज्ञानेश्वरी लोंढे, रसायनशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

आता जे लिटमस पेपर बनवले जातात ते ‘लायकेन’पासून बनवले जातात. लायकेन हे एकप्रकारची वनस्पती (अल्गी) आणि बुरशी (फंगस्) पासून बनवले जाते. पर्यावरणीयदृष्टय़ा ते घातही आहे. लिटमस पेपर रासायनिक उद्योगांमध्ये, प्रयोगशाळा आणि बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडतात. लायकेनपासून बनवलेल्या लिटमसची किंमत सात रुपये पडते. जेव्हा की लाल कोबीपासून रस काढून बनवलेल्या पीएचची किंमत २० पैसे आहे.    – ऐश्वर्या म्हैसकर, रसायनशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

First Published on February 12, 2019 2:39 am

Web Title: litmus paper from red cabbage