स्थानिक, विदर्भातील कलावंतांना डावलले, आमंत्रितांसाठी मोठा खर्च
महापालिकेची बेताची आर्थिक परिस्थिती बघता राज्य सरकारच्या सहकार्याने ‘नागपूर महोत्सव’ आयोजित केला जातो. त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. स्थानिक कलावंतांसह विदर्भातील कलावंतांना यंदाच्या महोत्सवात कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलावंतांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन कला सादर केलेली असताना त्यांची कला मात्र महापालिकेच्या महोत्सव आयोजन समितीला दिसले नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियममध्ये नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकार २ कोटी देणार असून उर्वरित खर्च महापालिका प्रशासन आणि लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. शिवाय महोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करून जाहिरातीच्या माध्यमातून विविध प्रतिष्ठानाकडून पैसा गोळा केला जात आहे. या चार दिवसीय नागपूर महोत्सव भव्य दिव्य करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून त्यांच्या मदतीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उस्ताद झाकीर हुसेन, ज्येष्ठ गझल गायक हरिहरन आणि गायक अजितसिंग यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, यापैकी एकही कलावंत महोत्सवात येणार नाही.
२८ फेब्रुवारीला उद्घाटनानंतर मोहीत चव्हाण यांचा ‘लाईव्ह इन कन्सर्ट’ कार्यक्रम होणार आहे. २९ फेब्रुवारीला कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात मुनवर राणा (कोलकाता), अर्जुन सिसोदिया (दिल्ली), गोविंद राठी (सजालपूर), रचना तिवारी (सोनभद्र), सुदीप जबलपूर (जबलपूर) सहभागी होणार असून मंच संचालन राजीव शर्मा करणार आहेत. १ मार्च रोजी सेल्वा गणेशा, निलाद्री कुमार आणि कार्तिक यांचा फ्युजन हा कार्यक्रम होणार आहे. समारोपाला चौरंग मुंबईतर्फे अशोक हांडे निर्मित मराठी बाणा हा कार्यक्रम होणार आहे.
या सर्व आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये स्थानिकासह आणि विदर्भातील कलावंतांना डावण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी कवी संमेलन करण्यात आले असले आणि त्यांच्या जीवनावरील कविता सादर केल्या जाणार असताना महाराष्ट्रातील एकही मान्यवर कवींचा समावेश करण्यात आला नाही. नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात अनेक चांगले मराठी आणि हिंदी गाणी सादर करणारे वाद्यवंृद असताना दरवर्षी अशोक हांडे यांचा मराठी बाणा का सादर केला जातो. यापूर्वी हांडे यांचा कार्यक्रम नागपुरात अनेक वेळा झाला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर तो अनेकदा दाखविण्यात आला असताना मराठी बाणाचा महापालिके ला इतका पुळका का, असा प्रश्न स्थानिक कलावंतांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

नागपूर महोत्सवाचे उद्घाटन २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, खासदार विजय दर्डा, अविनाश पांडे, अजय संचेती, कृपाल तुमाने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
’ या महोत्सवासंदर्भात महापौर प्रवीण दटके म्हणाले, १९ फेब्रुवारीला शहरातील दहा झोनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरसह विदर्भात अनेक चांगले मराठी- हिंदी गीते सादर करणारे संच असताना एकाला आमंत्रित केले नाही म्हणून टीका केली जाते त्यामुळे स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम आधीच आटोपले आहेत. कवी संमेलनात राष्ट्रीय पातळीवरील कवी असल्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाकडून महोत्सवासाठी दोन कोटी रुपये मिळणार आहेत.