शालेय पुस्तकांच्या विक्रीतून लूट

कोटय़वधीच्या घरात शालेय पुस्तकांची उलाढाल असलेल्या नागपुरात दिल्ली पब्लिशर्सचा गोरखधंदा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच फळफळला असून स्थानिक विक्रेत्यांनी त्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली आहे.

कोणत्याही परिस्थितीत हा गोरखधंदा बंद व्हावा आणि स्थानिक दुकानदारांकडूनच पुस्तके खरेदी करावी यासाठी शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या माध्यमातून दुकानदार संघटित होत आहेत. यासंदर्भात त्यांनी शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडले.

शाळा सुरू होण्याची तारीख अद्याप लांब असली तरी नागपुरातील बऱ्याच शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शाळांमध्ये पुस्तके, शैक्षणिक साहित्य विक्री होऊन मुलांनी २६ जूनला गणवेश घालून यायची वाट तेवढी ते पाहत आहेत. मात्र, अद्यापही अनेक शाळा बंद आहेत.

शाळा सुरू होईपर्यंत वाट पाहणे आणि नंतरच सर्व प्रक्रिया राबवणे हा दरवर्षीचा क्रम ते याही वेळी कायम ठेवणार आहेत. मात्र, एव्हाना इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी संगनमत करून कुठली पुस्तके घ्यायची, त्यावर किती सवलत आणि ती कोणत्या दुकानदारांकडे मिळतील याची तडजोड आधीच झाली आहे. शाळांचे विद्यार्थी पुस्तके वा शैक्षणिक साहित्य स्थानिक विक्रेत्यांकडून न नेता परस्पर प्रकाशक आणि कापड व्यापारी तसेच इतर साहित्याचा व्यापार करणाऱ्यांकडून सवलतीच्या दरात घेत आहे.

सागर, आनंद, इस्लामी किताब घर, शिप्रा, यश, क्रांती एवढेच नव्हे तर यापेक्षा जास्त कितीतरी प्रकाशकांची पुस्तके  घेण्याची शिफारस शाळांमधून केली जाते. हे सर्व प्रकाशक दिल्लीतील आहेत. यांचा संघटनेने विरोध करणे सुरू केले आहे. दुकानदारांना बाजूला सारून शाळाच हल्ली व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नफाखोरी करीत असल्याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली असता या विरोधात पालकांनी तक्रार करायला हवी. तुम्ही का करता? असा प्रश्न शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी विचारला, असे शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

शालेय क्षेत्रामध्ये पुस्तकांवर सवलत देण्याचा गोरखधंदा दिल्लीपासून सुरू झाला आहे. तो नागपूरसह सर्वत्र पसरला आहे. शाळांना जी पुस्तके हवी त्याची यादी शिक्षण विभागाने जानेवारीमध्ये आमच्याकडे द्यावी. आम्ही त्या त्या भागातील दुकानदारांना ती यादी देऊ जेणे करून प्रत्येक मुलाला पुस्तके मिळतील.

– विजयकुमार जैन, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना