24 January 2021

News Flash

पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाला कुलूप लावण्याची वेळ!

गेल्या आठवड्यात परिवहन खात्याने पूर्व कार्यालयातील पाच मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

(संग्रहित छायाचित्र)

 

|| महेश बोकडे

सातपैकी पाच मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर : पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित नागपूर शहरातील ७० टक्के भाग येतो. या कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची केवळ ७ पदे भरलेली असून त्यातील एक निरीक्षक वैद्यकीय रजेवर आहे, तर पाच निरीक्षकांची इतरत्र बदली झाली आहे. परिणामी, या कार्यालयालाच कुलूप लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहर आरटीओ कार्यालयात सुमारे १८ तर त्याहून जास्त शहराचा भाग असलेल्या पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयात १५ मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. गेल्या आठवड्यात परिवहन खात्याने पूर्व कार्यालयातील  पाच मोटार वाहन निरीक्षकांच्या  बदल्या केल्या. त्या बदल्यात येथे एकही नवीन निरीक्षक दिला  नाही. त्यातच येथील एक महिला मोटार वाहन निरीक्षक  वैद्यकीय रजेवर आहे. त्यामुळे बदली झालेल्या पाच निरीक्षकांना अद्याप कार्यमुक्त केले नाही.  हे निरीक्षक कार्यमुक्त झाल्यावर या कार्यालयातील  कामे कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे एक पद मंजूर आहे. परंतु या अधिकाऱ्याकडे चंद्रपूरचाही अतिरिक्त पदभार  आहे. त्यामुळे  येथील  कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.  या प्रकारावरून पुन्हा विदर्भातील कार्यालयांत मनुष्यबळ न देऊन शासन अन्याय करीत असल्याचा आरोप होत आहे.

दोन कर्मचारी आलेच नाही

पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयात काही महिन्यापूर्वी दोन मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. परंतु त्यातील एकाने  स्वेच्छानिवृत्ती घेतली तर दुसऱ्याने  आपली  बदली इतरत्र करून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

शहर आरटीओत मोटार वाहन निरीक्षकांची एकूण १८ पदे मंजूर असून त्यातील १ निलंबित, १ वैद्यकीय रजेवर तर दोन प्रतिनियुक्तीवर  आहेत. त्यामुळे सध्या येथे १३ निरीक्षक आहेत. त्यातील दोन निरीक्षक पूर्व नागपूर आरटीओत प्रतिनियुक्तीवर  आहेत. त्यामुळे  कोणतेही काम अडणार नाही.  कार्यालय बंद पडू नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात असून  प्रसंगी फिरत्या कारवाई पथकाचे काम थांबवले जाईल.

– दिनकर मनवर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 1:53 am

Web Title: lock east nagpur rto office transfers of motor vehicle inspectors akp 94
Next Stories
1 करोनामुक्तांहून नवीन करोनाबाधित तिप्पट
2 गडचिरोलीतील पोलीस पत्नीला गृहमंत्र्यांच्या पत्नीचे पत्र
3 गोरेवाडा बचाव केंद्रातून सर्व वन्यप्राणी स्थानांतरित
Just Now!
X