मोमिनपुऱ्यात पोलिसांना घेराव; सीताबर्डीत उद्यापासून दुकाने उघडण्याचा इशारा

नागपूर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने अंशत: टाळेबंदी लागू केली आहे. परंतु, आधीच आर्थिक आव्हानांचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांचा या टाळेबंदीला विरोध आहे. हा विरोध दिवसागणिक प्रखर होत आहे. आज बुधवारी मोमिनपुरा परिसरात  व्यापाऱ्यांनी पोलिसांना घेराव घ्-ाातला. सीताबर्डीतही आंदोलनात्मक प्रवित्रा घेऊन शुक्रवारपासून दुकाने उघडणार असल्याचा इशारा दिला. तिकडे भाजपच्या व्यापारी आघडीनेही टाळेबंदीविरुद्ध आंदोलन केले.

इतवारी व मोमिनपुरा परिसरात दररोज व्यापाऱ्यांकडून निर्बंध झुगारून आस्थापना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांकडून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत असताना संतप्त व्यापारी पोलिसांच्या अंगावर धाऊन जात आहेत. पोलिसांकडून व्यापाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण, त्यानंतरही व्यापारी ऐकायला तयार नाहीत. मोमिनपुरा परिसरातील व्यापारी संघटनेच्या जावेद नावाच्या पदाधिकाऱ्याने टाळेबंदीच्या विरोधात चित्रफित प्रसिद्ध केली होती. तहसील पोलीस ठाण्याचे कर्मचारी समजावण्यासाठी गेले असता परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेराव घातला. शेवटी लोकांकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण होण्याची परिस्थिती निर्माण होत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी व्यापाऱ्यांची समजूत घातली. काही वेळाने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.

सीताबर्डी मर्चंट असोसिएशननेही  टाळेबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी प्रशासनाला ४८ तासांचा इशारा दिला. टाळेबंदी मागे घेतली नाही तर शुक्रवारी सकाळी ११ वाजता बर्डीची सर्व बाजारपेठ सुरू करू, असा इशारा  सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे सचिव नुरल्ला अजानी यांनी दिला. बुधवारी टाळेबंदीच्या विरोधात बर्डीतील व्यापारी संघटनेने एकत्र येत सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.  गेल्यावर्षीच्या टाळेबंदीत आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य केले. आता करोनाची लस आली आहे. मात्र तरीही करोना आटोक्यात आणण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा भुर्दंड आम्ही का सोसायचा, असा या व्यापाऱ्यांचा सवाल आहे. बर्डीच्या मार्केटमध्ये एक हजारहून अधिक दुकाने असून जवळपास पन्नास हजार कामगार-कर्मचारी येथे दररोज काम करतात. याच दुकानांच्या भरवशावर त्यांचे पोट भरते.

बँकेच्या कर्जाचे हप्ते ते कसे फेडणार, कामगारांचे वेतन कसे देणार. हे आता आमच्या सहनशक्तीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे आम्ही सरकारला ४८ तासांचा  इशारा देत आहोत. टाळेबंदी मागे घेतली नाही तर शुक्रवारपासून बर्डी येथील सर्व बाजारपेठ आम्ही सुरू करू, जी  कारवाई आमच्यावर होईल त्याला समोर जाण्याची आमची तयारी आहे, असेही या व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

भाजप व्यापारी आघाडीचे आंदोलन

टाळेबंदीच्या आदेशाला विरोध करत भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीने बुधवारी शहीद चौकात आंदोलन केले. यावेळी इतवारी परिसरातील सराफा आणि इतर उद्योग क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर येत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.  भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विनय जेन यांच्या नेतृत्वात शहीद चौकात आंदोलन करण्यात आले. किराणा बाजारातील दुकाने वगळता अन्य बाजारपेठ आजही बंद ठेवण्यात आली असली तरी अनेक व्यापारी आपल्या दुकानासमोर उभे होते. अनेक व्यापाऱ्यांनी दुकानासमोर सरकारचा निषेध केला. यावेळी व्यापारी काळा पोशाख घालून आले होते. यावेळी नगरसेवक प्रदीप पोहोणे यांच्यासह  रितेश मोदी, बब्बू कुकरेजा, पंकज मनियार, राहुल गुप्ता, राजेश रोकडे, राकेश गांधी, संजय वाधवानी, अशोक शनिवारे, राकेश जैन, चंदन गोस्वामी  आदी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते. यावेळी गिरीश व्यास म्हणाले, राज्य सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला तेव्हा व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी भाजपने काही सूचना केल्या होत्या. मात्र सरकारने त्या मान्य केल्या नाहीत. एक दिवस एका बाजूने व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवावे, असा निर्णय घेतला तर व्यापारांचे नुकसान होणार नाही.  दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा सकारात्मक

कॉन्फ्रिडेशन ऑफ ऑफ इंडिया ट्रेडर्सची (कॅट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा झाली. यावेळी कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी टाळेबंदीमुळे विदर्भातील व्यापाऱ्यांसमोरील समस्या मांडल्या. टाळेबंदीपेक्षा ठराविक वेळेत व्यापार करू द्या, अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन दिवसात यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे भरतिया यांनी सांगितले.

दुकाने बंद करून करोना जाईल का?

सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, असे आम्ही म्हणार नाही. मात्र केवळ दुकाने बंद करून करोना जाईल का, असा आमचा सवाल आहे. शहरात कुठेही टाळेबंदीसारखे चित्र नाही. तुम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा न करता टाळेबंदी  करता. सरकार आणि विरोधी पक्ष देखील  टाळेबंदीला घेऊन राजकारण करीत आहेत. ही वेळ लोकांच्या सेवेसाठी एकजुटीने झटण्याची आहे. मात्र त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आमच्यासाठी नाही तर येथील ५० हजार कामगारांसाठी आम्ही शुक्रवारी बाजारपेठ सुरू करणार आहोत.– चंद्रकांत रघटाटे, अध्यक्ष, सीताबर्डी मर्चंट असोसिएशन.