जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती; शेतीच्या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

नागपूर : करोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहे. जिल्ह्य़ाबाबत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या शेतीचा हंगाम आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारणच शेतीवर आधारित आहे. याच काळात टाळेबंदी लागू केली तर अर्थकारणच थांबेल. करोनावर उपाययोजना ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यावर टाळेबंदी हा सध्या पर्याय नाही. जिल्ह्य़ातील उपाययोजनांबाबत ठाकरे म्हणाले, ज्या कारणांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे त्याचा शोध घेतला जात आहे. ८५०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ात नागरिकांची तपासणी केली जात असून ताप, खोकला किंवा तत्सम आजार झालेल्यांची माहिती संकलित केली जात आहे.

अ‍ॅन्टिजन चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत अशाप्रकारच्या चार हजार चाचण्या करण्यात आल्या. १० हजारावर किट्स वाटप करण्यात आल्या आहेत.  प्राथमिक आरोग्य केंद्रात अ‍ॅन्टिजन चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कमी वेळेत जास्त रुग्णांची तपासणी व बाधितांचा शोध घेता येईल. संशयित रुग्णाची कोविड चाचणी केली जाते. आता बाधित किंवा संशयित रुग्णांना नागपूरला आणण्याची गरज नाही, ग्रामीण भागातच कोविड केंद्र तसेच विलगीकरण केंद्राची सोय करण्यात आली आहे.  याशिवाय सर्व सलून चालक, भाजी विक्रेते, राष्ट्रीय महामार्गावरील धाबे, ऑटोरिक्षा चालक यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच नगरसेवक, गर्दीच्या ठिकाणी वृत्त संकलन करणारे ग्रामीण पत्रकार यांचेही करोना निर्मूलनाच्या प्रक्रियेत सहकार्य घेण्यात येणार आहे.

बाधित शहरातून आलेल्यांची तपासणी

मुंबई, पुणे, नागपूर व अन्य अधिक प्रमाणात रुग्ण असलेल्या शहरातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना विलगीकरणाची सक्ती करण्यात आली आहे.