काँग्रेस नेते अविनाश पांडे यांचा दावा

नागपूर : काँग्रेसच्या जागा हिंदी भाषिक पट्टय़ातून मोठय़ा संख्येने वाढण्याची आशा असून विविध पक्षांशी मतदानोत्तर आघाडी करून काँग्रेस प्रणीत सरकार केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा दावा काँग्रेस नेते व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

हिंदी हार्टलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारमध्ये जागा वाढणार आहेत. सोबतच गुजरात आणि कर्नाटकात काँग्रेसच्या जागा वाढतील.

या सर्व जागा मिळून काँग्रेसला १९० ते २०० च्या जवळपास जागा मिळतील. उर्वरित जागा तृणमूल काँग्रेस, बसपा-सपा आणि डीएमके यांच्याशी आघाडी होऊन सत्ता स्थापन केली जाईल. काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्य अलीकडे परत मिळवले आहेत. कर्नाटकमध्ये सरकार असून गुजरातमध्ये फार थोडय़ा जागांनी पराभव झाला होता, असेही ते म्हणाले. राजस्थानमध्ये काँग्रेसचा सध्या एकही खासदार नाही.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट अतिशय चांगले काम करीत असून तेथे २५ च्या २५ जागांवर विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ हे लोकसभेच्या प्रत्येक जागांचे वेगळे नियोजन करीत आहेत. तेथेही जागांची संख्या वाढणार आहे, असा दावा पांडे यांनी केला. उत्तर प्रदेश विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागांमध्ये भर पडणार आहे. शिवाय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे या प्रदेशची जबाबदारी आहे. तेथील लोक पुन्हा काँग्रेसकडे परतू लागले आहेत. त्यामुळे २०२२ ची विधानसभा काँग्रेस जिंकेल, असेही ते म्हणाले.