देवेंद्र गावंडे

विदर्भातील काँग्रेसची अवस्था एखाद्या धरणातील मृत पाणीसाठय़ासारखी झाली आहे. पाऊस पडल्याशिवाय हा पाणीसाठा कधी वाढत नाही. उलट पाऊस आलाच नाही तर तो आणखी कमी कमी होत जातो. काँग्रेसचे अगदी तसेच झाले आहे. या पक्षाचे जेवढे पारंपरिक मतदार आहेत तेवढी मते हा पक्ष घेतो. त्यात भर घालण्याची म्हणजे पाऊस पाडण्याची धमक या पक्षाच्या एकाही नेत्याकडे नाही. नाही म्हणायला दर निवडणुकीत या मृतसाठय़ाला पाण्याचे काही ओहोळ येऊन मिळत राहतात. त्यामुळे साठय़ात म्हणजेच मतांमध्ये किंचित वाढ होत असते. अर्थात, हे ओहोळ आणण्यामागे नेत्यांचे कर्तृत्व शून्य असते. एकूणच मतांचा पाऊस पाडून धरण भरण्याची कला वैदर्भीय नेते पार विसरून गेले आहेत. खरे तर अनेकांना ही कला अवगत आहे, पण त्यासाठी मेहनत घ्यायची त्यांची तयारी नाही. कधी राहुल तर कधी प्रियंकाच्या रूपाने एखादा देवदूत येईल व तो धरण भरेल, या आयतोबाच्या भूमिकेत सारे नेते रममाण झाले आहेत. या नेत्यांची मेहनतीसाठी तयारी नाही; कारण या सर्वाना एकप्रकारची सुस्ती आली आहे. ही सुस्ती अनेकदा अंगावर सूज आणते. तशी ती या नेत्यांच्या अंगावर दिसते.

या सूजीला अनेक संदर्भ आहेत. आर्थिक सुबत्ता  हा त्यातला महत्त्वाचा! पक्ष खड्डय़ात गेला तरी या नेत्यांचे काहीच बिघडत नाही. हा यातून येणारा दृष्टिकोन. तो या नेत्यांमध्ये ठासलेला दिसतो. अशा स्थितीत मग करायचे काय तर प्रत्येक निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवायची, पराभूत व्हायचे व पक्षाचा नेता हे बिरुद समोरची पाच वर्षे मिरवत राहायचे. आपल्या लोकशाहीत विजेत्याला सर्वात जास्त सन्मान मिळतो, पराभूतांना सुद्धा थोडाफार मिळतो. त्याच बळावर आर्थिक सुबत्तेत वाढ करायची, संस्थांचा विस्तार करायचा आणि पक्षाचे नेतेपद स्वदरबारात राहील याची काळजी घेत मजेत जगायचे, हीच या नेत्यांची विद्यमान जीवनशैली झाली आहे. या शैलीला सुद्धा अनेक कंगोरे आहेत. पित्याचा पराभव झाला की पुत्राला उभे करायचे. त्याच्या मार्गात येणारे नवे चेहरे खडय़ासारखे दूर करायचे. पक्ष मतांच्या मृत साठय़ावर येऊन पोहचला तरी बंडखोरी करायची, पाडापाडीचे राजकारण करायचे, वरून त्याला तात्त्विकतेची जोड द्यायची, आपल्याच पक्षाच्या नेत्याविरुद्ध आंदोलने करायची, एकमेकांना खड्डय़ात कसे घालता येईल यासाठी प्रयत्न करायचे. व्यक्तिगत कामे करून घेण्यासाठी विरोधकांशी संधान साधायचे. विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना मते विकायची. विरोधकांच्या मदतीने पक्षात अपशकून कसा करता येईल याचे धडे घ्यायचे. शाई फेकण्याचे प्रशिक्षण घ्यायचे. जाहीर उमदेवाराला जाहीरपणे मोडता घालायचा. पक्षाची स्थिती कितीही खराब असली तरी प्रभावातील मते विरोधकांकडे वळवायची. या साऱ्या डावपेचात हे नेते आता अगदी तरबेज झाले आहेत. पक्ष म्हणजे सर्वोच्च निष्ठेचे स्थान असे गृहीत धरले तर आपण या निष्ठेशीच व्यभिचार करतो आहोत, हे या नेत्यांना कळते पण त्यांची वृत्ती काही वळत नाही.

या नेत्यांचे वर्तन बघून काँग्रेस हा कधीकाळी गांधी, नेहरूंचा पक्ष होता याची आठवण जरी काढली तरी लाज वाटावी. प्रत्यक्षात या नेत्यांना मात्र त्यांच्या कृतीचे काहीच वाटत नाही. उलट ते प्रत्येक भाषणातून गांधी, नेहरूंचे नाव घेत त्यांच्या काँग्रेसी असण्याच्या निष्ठा सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतात. आपल्याला लोक हसताहेत, गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत, जनमत ढासळत चालले आहे, याची या नेत्यांना पर्वा नाही. कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. जी काही हानी होईल ती पक्षाची अशीच या नेत्यांची भूमिका असते. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. बघता बघता भाजपने तो काबीज केला. तो पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल तर संघटनात्मक पातळीवर प्रचंड मेहनत करावी लागेल. ती करण्याची या नेत्यांची तयारीच नाही. खरे तर आर्थिक सुबत्ता अथवा श्रीमंतीचा व मेहनतीचा काहीएक संबंध नाही. भाजपमध्येही श्रीमंत नेते आहेत. मात्र ते सदैव घाम गाळताना दिसतात. त्यांची श्रीमंती पक्षाच्या भल्यासाठी वापरली जात असल्याची अनेक उदाहरणे विदर्भात आहेत. काँग्रेस नेत्यांचे वागणे अगदी विरुद्ध आहे. ते स्वत:च्या श्रीमंतीवर पक्षाचा भार येऊ देत नाहीत. म्हणूनच राहुल गांधींवर पक्ष गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले असे विधान करण्याची वेळ येते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:ची श्रीमंती पक्षावर उधळून लावण्यास तयार झालेला एकही नेता विदर्भात दिसला नाही. यावरून या नेत्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते.

गेल्या पाच वर्षांत तर हे नेते नुसते प्रतिक्रियावादी झालेले दिसले. सत्ताधाऱ्यांनी एखादी चूक केली की त्यावर बोलायचे. पक्षाने दिल्लीतून एखाद्या आंदोलनाचा आदेश दिला की तेवढे करायचे. मग पुन्हा आपल्या दरबारात रममाण व्हायचे. या नेत्यांचा प्रतिक्रियावाद जनतेच्या सुद्धा लक्षात आला. त्यामुळे ती या पक्षाकडे वळायला तयार नाही. पक्ष वाढवायचा असेल तर यापलीकडे जावे लागते. पक्षाची भूमिका, दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहचवावा लागतो. ते करण्याची या नेत्यांची अजिबात तयारी नाही. यात मरण होते ते कार्यकर्त्यांचे. अनेकांच्या हे लक्षात आल्यावर या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओघ सुद्धा आटला आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना पक्ष विस्तारासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. विदर्भाच्या ग्रामीण भागात प्रचंड नाराजी होती. शेतकरी अस्वस्थ होते, मरत होते, बेरोजगार मोर्चे काढत होते, विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी झगडत होते. यापैकी एकाही मुद्यावर या नेत्यांना पुढाकार घ्यावासा वाटला नाही.

काही ठिकाणी अपवादात्मक आंदोलने झाली पण ती करणाऱ्या नेत्यांमध्ये सातत्य दिसून आले नाही. ज्यांना पक्षाने पदे दिली, त्यातून प्रतिष्ठा दिली, श्रीमंतीचा मार्ग खुला करून दिला ते नेते मात्र रस्त्यावर उतरताना कधी दिसले नाही. काँग्रेसच्या या नेत्यांपेक्षा विदर्भात स्वयंसेवी संस्था व वेगवेगळ्या संघटनांनी सरकारविरुद्ध अनेकदा पुकारलेला एल्गार मोठा व व्यापक होता. यावरून या नेत्यांची सुस्ती व सूज किती गंभीर आहे याची कल्पना यावी. त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटले. मेहनत घेणेच विसरून गेलेले हे नेते पक्षासाठी अवघड जागचे दुखणे होऊन बसले आहेत. आपल्यामुळे पक्षाची माती होत आहे तेव्हा निवृत्ती घेतलेली उत्तम! असा विचार या नेत्यांच्या मनात येत नसेल का?