देवेंद्र गावंडे

‘२०१४ चा निकाल मोदीलाटेमुळे विरोधात गेला. हा निकाल अपवाद होता. नागपूर हा काँग्रेसचा गड आहे. अनेक निवडणुकांमध्ये ते सिद्ध झाले आहे. यावेळीही होईल. नागपूरचे जाती व धर्माचे समीकरणच वेगळे आहे. यात उजव्या विचारांना स्थान नाही’ असा भ्रम काँग्रेसच्या नेत्यांनी गेली पाच वर्षे बाळगला. याच भ्रमात गुरफटल्याने हे नेते निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत करावी लागते, संघटना बांधावी लागते, कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागते हे विसरून गेले. अखेर यावेळच्या निकालाने हा भ्रमाचा भोपळा फुटला. सलग दुसऱ्यांदा येथे उजवा विचार विजयी झाला. आता हेच नेते यावेळी मोदींची सुप्त लाट होती, असा नवा भ्रम तयार करून त्यात वावरायला लागले आहेत. सामान्य मतदार दोनदोनदा धोबीपछाड देत आहेत तरीही त्यातून बोध घ्यावा, असे त्यांना वाटत नाही. काँग्रेसच्या सततच्या अपयशाला नेत्यांची ही भ्रामक वृत्ती सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. खरे तर काँग्रेसला विदर्भात पुन्हा पाय रोवायचे असतील तर आमूलाग्र बदलणे भाग आहे.

आज विदर्भातील सर्व जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या नेत्यांची नावे नजरेसमोर आणा. हे सर्व ८०च्या दशकात राजकारणात आलेले. तेव्हा इंदिरा गांधींनी नव्या रक्ताला संधी दिली व या नेत्यांचा उदय झाला. त्याला आता ४० वर्षे लोटली. या चार दशकात या नेत्यांचा करिष्मा पार ओसरला आहे. मतदारांनी त्यांचा दोनचार वेळा पराभव करून त्याची जाणीवही करून दिली आहे. तरीही हा पक्ष माणिकराव ठाकरेंना रिंगणात उतरवण्याचे धाडस करतो हे आश्चर्य आहे. यातील काही नेते जनतेने पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यावर पक्षाच्या दरबारी राजकारणात सक्रिय झाले. तिथे फक्त श्रेष्ठींना खूष ठेवावे लागते. ते एकदा साध्य झाले की मर्जीतल्या माणसांना उमेदवारी मिळवून देता येते. पक्षाची इतकी वाईट दशा असताना सुद्धा या दरबारी नेत्यांनी रामटेक व चंद्रपूरमध्ये हाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले ते रामटेकमध्ये. चंद्रपूरचा डाव अशोक चव्हाणांनी उधळून लावला. अपेक्षेप्रमाणे रामटेकमध्ये पक्ष पराभूत झाला तर चंद्रपुरात विजयी. ज्या वासनिकांच्या आग्रहावरून रामटेकचा निर्णय घेण्यात आला त्यांचा वैदर्भीय जनतेशी अजिबात संपर्क राहिलेला नाही. वर्षांतून दोनवेळा नागपुरात आले म्हणजे झाला संपर्क, असे दिवस आता राहिले नाही. तरीही त्यांच्या मताला पक्षात किंमत असेल तर तो विजयी कसा होणार? या चाळीस वर्षांपूर्वीच्या नेत्यांना बाजूला सारणे, त्यांच्या उपद्रवमूल्याची तीव्रता कमी करणे, त्यांच्या मुलांना उमेदवारी नाकारणे हे विदर्भातील काँग्रेससमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. हा पक्ष ते खरोखर पेलेल का, हा कळीचा प्रश्न आहे. या नेत्यांच्या दरबारी राजकारणामुळेच या पक्षात नव्याने उदयाला आलेले अनेक तरुण नेते दुसऱ्या पक्षात निघून गेले. अमरावतीचे सुनील देशमुख हे त्यातले महत्त्वाचे उदाहरण. आज पश्चिम विदर्भात हर्षवर्धन सपकाळ सोडले तर नाव घेण्यासारखा एकही दमदार नेता या पक्षाकडे नाही. राष्ट्रवादीची सुद्धा तशीच स्थिती आहे. अशा स्थितीत हा पक्ष कशाच्या बळावर भाजपशी लढणार? या नेत्यांच्या दरबारी राजकारणाला न कंटाळता काही तरुण कार्यकर्ते अजूनही पक्षात तग धरून आहेत. नागपूरचा विचार केला तर प्रफुल्ल गुडधे, अतुल लोंढे व यासारखे अनेक तरुण आहेत. विदर्भाच्या इतर जिल्ह्य़ात सुद्धा असे अनेक तरुण नेते असतील. त्यांना संधी देण्याचा साधा विचारही या पक्षात कधी होताना दिसत नाही.

मुळात या पक्षात उमेदवारी देण्याची पद्धतच इतकी सदोष व दरबारी नेत्यांना महत्त्व देणारी आहे की अनेकदा या तरुणांचा त्यात निभावच लागत नाही. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत तेच तेच कंटाळवाणे चेहरे हा पक्ष रिंगणात उतरवत आला आहे. दुसरा मुद्दा आहे तो जनतेत व त्यातल्या त्यात नवीन पिढीत पक्षाविषयी विश्वास निर्माण करण्याचा. यात हे जुने नेते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी पराभव झाल्यावर जनता भाजपवर नाराज होईल व आपसूकच काँग्रेसच्या बाजूने वळेल, या भ्रमात हे नेते राहिले. प्रत्यक्षात झाले उलटेच. जनतेने गेल्या खेपेपेक्षा जास्त पटीने भाजपवर विश्वास टाकला. जनतेत अनेक मुद्यावर सरकारविरुद्ध नाराजी असूनही असे का घडले, याचे उत्तर काँग्रस जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरली हे आहे. सरकारच्या अपयशाचे मुद्दे ठाऊक असूनही भाजपने गेली पाच वर्षे त्यांची विचारधारा जास्तीत जास्त रुजवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचा मारा जनतेवर केला. हे कार्यक्रम समाजाच्या सर्व घटकात पोहचतील, याची काळजी घेतली. हे सर्व सुरू असताना वैदर्भीय काँग्रेस नेते शांत होते. ही विचारधारेची लढाई आहे तेव्हा महात्मा गांधीच आपल्याला तारू शकतील, हा साधा विचार या नेत्यांच्या मनात आला नाही. गांधी केवळ राजकीय व्यासपीठावर वापरून चालत नाही. जीवनाच्या सर्व अंगाला व्यापणारे विचार मांडणारा हा द्रष्टा पुरुष सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरून सुद्धा जनतेपर्यंत पोहचवता येतो, हे या नेत्यांच्या लक्षातच आले नाही.

आजच्या नव्या पिढीला गांधीही फारसे ठाऊक नाहीत. त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे कष्ट हे नेते घेताना कधी दिसले नाहीत. नवी पिढी फार वेगळा विचार करणारी आहे. त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. त्यातले अनेक आभासी जगाला भुलणारे आहेत. त्यांच्यापर्यंत त्याच पद्धतीने जायला हवे, हेही या नेत्यांना कधी जाणवल्याचे दिसले नाही. याच पराभवाच्या काळात काँग्रेसचे नेते जातीपातीच्या राजकारणाचा विचार मात्र मोठय़ा गांभीर्याने करत राहिले. प्रत्यक्ष निकालात काँग्रेसचे जातीचे गणित मतदारांनी उलथवून लावले. मध्यमवर्ग, तरुण पिढी या सर्वानी काँग्रेसच्या या परंपरागत राजकारणाला दूर सारले. यातून बाहेर पडायचे असेल तर काँग्रेसला नव्या तरुणांच्या हाती स्थानिक राजकारणाची सूत्रे सोपवणे भाग आहे. हे खरेच घडेल का, या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे. पक्षात मार्गदर्शकाची सुद्धा गरज असते, हे काँग्रेसचे जुने नेते मान्य करायला तयारच नाहीत. काहीही झाले तरी पक्षाची दोरी आपल्याच हाती हवी हा त्यांचा आग्रह असतो व आहे. पक्षाला जेव्हा सुगीचे दिवस होते तेव्हा हा आग्रह चालून गेला.

आता तर परिस्थिती वाईट आहे. तरीही हे नेते जागा सोडायला तयार नसतील तर कधीकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, हे वाक्य इतिहासात फार कमी वेळा वाचले जाईल.