|| देवेंद्र गावंडे

जेथे जाहिराती लावू नका असे लिहिलेले असते तेथेच नेमक्या जाहिराती दिसणे, न थुंकण्याची व न लघवी करण्याची जागा हमखास घाण करून ठेवणे, वाहने उभी करू नका असे निर्देश असलेल्या ठिकाणी नेमकी वाहनांची गर्दी दिसणे, हागणदारीमुक्तीचा परिसर अशी ओळख असलेल्या ठिकाणीच घाण दिसणे ही आपल्या समाजव्यवस्थेतील विकृत लक्षणे आहेत. नियम पाळण्यापेक्षा मोडणे हेच जिथे शौर्याचे प्रतीक समजले जाते अशा समाजाला शिस्तीचे धडे देणे किती जिकरीचे आहे याचे विदारक दर्शन सध्या करोनाच्या निमित्ताने विदर्भात सर्वत्र होत आहे. मुळात करोनाचे संकट खरोखरच गंभीर. सामूहिकपणे त्याचा मुकाबला केल्याखेरीज ते टळणारे नाही. याची जाणीव असून सुद्धा लोक चौकाचौकात, गल्ल्यांमध्ये जे वेडय़ाचा बाजार भरवत आहेत ते संतापजनक व चीड आणणारे आहे. जनता संचारबंदीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता टाळ्या वाजवण्याच्या निमित्ताने विदर्भात अनेक ठिकाणी चक्क धुडगूस घातला गेला. उपराजधानीतील खामला भागात तर फटाके फोडले गेले. पूर्व नागपुरात मिरवणुका निघाल्या. विदर्भात अनेक ठिकाणी हेच दृश्य होते. हा नियमभंग करण्यात भक्तमंडळी बरीच आघाडीवर होती. लाडक्या नेत्याप्रती विश्वास व्यक्त करण्याची हीच संधी आहे, या भावनेतून या जल्लोषाचे चित्रीकरण करण्यात आले. करोना नष्ट होवो अथवा न होवो पण नेत्याची प्रतिमा उंचावत राहिली पाहिजे हाच हेतू यामागे होता. हे बघून मग इतरांना नियमभंगाचा चेव चढला तर त्यांना म्हणून का दोष द्यायचा?

आपल्याकडे पूर्वापार हेच होत आले आहे. टोलनाक्यावर राजकारण्यांना अडवले की ते हमखास धिंगाणा घालतात. या नेत्यांसाठी वाहतुकीचे नियम नसतात. त्यांनी त्याचा भंग केला तरी कारवाई होत नाही. आता तर बहुसंख्य टोलनाक्यावर पक्षाचे नाव सांगितले की सहज सोडून देतात. याकडे समाजात शौर्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. ज्यांच्याकडून सुधारणेची अपेक्षा आहे तेच नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही मग आपणच का पाळायचा, अशी वृत्ती समाजाच्या सर्व स्तरात आता रुजली आहे. अशा समाजाला अचानक शिस्त पाळण्यास सांगणे किती कठीण असते याचाच अनुभव साऱ्यांना यानिमित्ताने येत आहे. नियम हे मोडण्यासाठीच असतात अशी ठाम धारणा बाळगणारे अनेक लोक आहेत.

आता आणीबाणीची स्थिती असल्याने बळाचा वापर करून या साऱ्यांना वठणीवर आणले जात असले तरी अशा बेशिस्त व विस्कळीत समाजाचे पुढे काय होणार हा प्रश्न उरतोच! संचारबंदी लागू झाल्यावर कुणाला रुग्णालयात जायचे असेल तर सवलत मिळेल असे जाहीर झाले आणि लगेच लोकांनी घरातील जुन्या औषधी चिठ्ठय़ा, एक्सरे बाहेर काढले. मानेवाडा चौकात कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला दिवसभरात असे अनेक बनावट रुग्ण बघावे लागले. एकमेकांशी कमीत कमी संपर्क हे करोनाविरोधी लढय़ातील एक तत्त्व आहे. अशी खोटी कागदपत्रे दाखवून आपण थेट मृत्यूलाच आमंत्रण देत आहोत याचे भान यापैकी कुणालाही नसावे हे अतिशय दुर्दैवी आहे.

विदर्भात करोनाविरोधी लढय़ाची सुरुवातच मुळी रुग्ण पळून जाण्याने झाली. पळून जाण्याने जीव कसा वाचेल हे या रुग्णांच्या गावीही नव्हते. या आजाराचे पहिल्या टप्प्यातील रुग्ण हे उच्च मध्यमवर्गीय गटातील होते. हा वर्ग सरकारी आरोग्य सेवेच्या नावाने सदैव बोटे मोडणारा म्हणून तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात जाणे अनेकांच्या जीवावर आलेले. पलायनाची घटना त्यातूनच घडली. अनेकांनी तर विमानतळावरील चाचणीला गुंगारा देत शहरात येऊन प्रशासनाला कळवले सुद्धा नाही. अशांना पकडून विलगीकरण कक्षात आणावे लागले. देशात तपासणी सुरू झाल्याचे कळल्यावर विमानतळावरील चाचणीतून निसटता यावे यासाठी अनेकांनी विमानातच तापनियंत्रणाची औषधे घेतली. हे सारे प्रकार सभ्य व सुसंस्कृत समाजव्यवस्थेत मोडणारे नाहीत. सारे जग या आजाराने ग्रस्त असताना व वाढत्या मृत्यूसंख्येने सर्वत्र हाहाकार उडाला असताना तपासणीला सामोरे जावे लागू नये म्हणून वेगवेगळे डावपेच लढवणारे प्रवासी फक्त भारतीय असू शकतात असा समज करून घ्यायला काही हरकत नाही. आपल्या व्यवस्थेत प्रत्येक टप्प्यावर गरीब व श्रीमंत असा भेदभाव सर्रास केला जातो. प्रारंभीच्या टप्प्यात या आजाराचे रुग्ण नेमके श्रीमंत निघाले. त्यातल्या त्यात खासगी रुग्णालयात या आजाराच्या निदानाची सुद्धा सोय नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. याच आजाराची लागण गरीब वस्त्यांमधून झाली असती तर हेच श्रीमंत या मुद्यावरून समाजाला ज्ञान वाटत नक्की फिरले असते.

संकट व आणीबाणीच्या काळात समाजाचे खरे रूप दिसत असते असा अनुभव आहे. त्याचे प्रत्यंतर या साथीच्या निमित्ताने वेळोवेळी येत आहे. नियम व कायदे पाळणे तर दूरच पण समाजातील अनेकांना स्वयंशिस्तीची सुद्धा सवय नाही. मी स्वत:हून शिस्त पाळेन असे म्हणणारे फार मोजके असतात. त्यांना आपल्याकडे सर्रास वेडे ठरवले जाते. करोनाविरोधात लढा देताना नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी अशी अपेक्षा प्रारंभी प्रशासनाने केली. त्याला अगदी चोवीस तासात हरताळ फासला गेला. तो फासण्यात समाजातील साऱ्या वर्गातील लोक होते. उलट उच्च मध्यमवर्गीयच आघाडीवर होते. हाच वर्ग जेव्हा परदेशी जातो तेव्हा सर्व नियमांचे निमूटपणे पालन करण्यात आघाडीवर असतो. देशात मात्र नियम मोडले तरी चालते अशीच त्याची वृत्ती असते. जोवर जीवावर बेतले नाही तोवर हे खपून गेले पण आता काय, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन कसे असावे, दुसऱ्याला त्रास होणार नाही या दृष्टीने कसे वागावे, परिस्थितीचे भान ओळखत काम कसे करायला हवे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे सामान्यांना ठाऊक असतात पण त्यांचे वागणे नेमके विरुद्ध असते.

आताचा कठीण काळ सोडा पण एरव्ही सुद्धा लोक अतिशय असभ्यपणे वागतात. त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्याची सवय सुद्धा साऱ्यांना जडून गेली आहे. नेमका तोच असभ्यपणा व नियमांचे उल्लंघन या संचारबंदीच्या काळात ठळकपणे दिसून आले. हे अतिशय वाईट आहे हे सारेच मान्य करतात, पण त्यात सुधारणेसाठी पुढाकार कुणी घ्यायचा यावर कुणाचेच एकमत होत नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण आम्ही नियम तोडतच जगू अशीच वृत्ती सर्वत्र फोफावली आहे. वाढत्या अपघात संख्येतून त्याचे दर्शन नेहमी होते. आता करोनाची भर त्यात पडली आहे.

devendra.gawande@expressindia.com