|| देवेंद्र गावंडे

आ म्ही वैदर्भीय माणसे लहानमोठ्या आजाराला अजिबात भीत नाही. असे कित्येक आजार व  साथीचे रोग आम्ही यशस्वीपणे परतवून लावले आहेत. मुळात माणूस हा सामाजिक प्राणी आहे या तत्त्वावर आमचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कायम सामाजिक दृष्टिकोनाचा विचार करायला आवडते. म्हणजे ‘लोक काय म्हणतील’ याची आम्ही जास्त काळजी घेत असतो. ओळखीतले, नातेवाईकाकडचे लग्न असेल तर सरकारने कितीही निर्बंध घालू देत आम्ही जातोच, तेरवी असो वा बारसे, गृहप्रवेश असो वा मावंदे आम्हाला पदरचे पैसे खर्च करून, खडतर प्रवास करून जायला आवडते. करोना काय आज आहे उद्या नाही. पण कार्यक्रमाला गेलो नाही याची बोच आयुष्यभर कशी सहन करणार? म्हणून आम्ही कितीही कडेकोट बंदोबस्त असला तरी तो वाकवून जातोच. तसेही आम्ही उत्सवप्रिय! काहीही करायचे असेल तर ते दणक्यात हीच आमची सवय. मग त्यासाठी कर्ज काढावे लागले तरी बेहत्तर! आता लग्नच बघा ना! आम्ही कर्ज काढून करतोच की! भलेही ते नंतर फेडणे जमले नाही तर आत्महत्या करू पण मंगलाष्टके हजारोंच्या उपस्थितीत व्हायला हवी याकडे आमचा तीव्र कटाक्ष असतो. आता या करोनामुळे केवळ पन्नासांची उपस्थितीचा नियम असला तरी त्याला आम्ही अजिबात जुमानत नाही. असले नियम मोडण्यासाठीच असतात यावर आमचा ठाम विश्वास. मुळात पन्नासला आम्ही शंभर समजतो. वेळेपर्यंत त्याचे दीडशे होतातच. काय करणार?

‘खिलवणे’ हा आमचा गुणधर्म.  कारवाईसाठी कुणी आलेच तर त्यांनाही आधी खाऊ घालतो मगच तडजोडीच्या गोष्टी करतो. करोना झाला तरी काळजी घ्यायला सरकार समर्थ आहे यावर आमचा भरवसा आहे. यानिमित्ताने का होईना सत्ताधारी विदर्भाकडे लक्ष देतील असे विनोद आम्ही गेले वर्षभर करतच आलो आहोत. तसेही विदर्भात साथीच्या अन्य आजाराने दरवर्षी शेकडो लोक मरतात. त्याचा एवढा गवगवा कुठे होतो. मग करोनाचाच का? म्हणून आम्ही बेधडक बाहेर पडतो. करोनामुळे आजारी पडले की भरपूर पैसा खर्च होतो हे खरे असले तरी अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडावेच लागणार ना! आता या अत्यावश्यक गोष्टीत सहज म्हणून बाजारात चक्कर टाकणे, नातेवाईकांची वास्तपुस्त फोनवर न करता प्रत्यक्ष भेटून करणे, गणगोतात नाराजी नको म्हणून प्रत्येक समारंभाला न चुकता हजेरी लावणे यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आम्ही केला आहे.

प्रशासन या गोष्टींना अनावश्यक व फालतू समजते त्याला आम्ही काय करणार? आमच्या विदर्भातील शहरांमध्ये आता बऱ्यापैकी फ्लॅटसंस्कृती रुजलेली. मात्र ती मुंबई, पुण्यासारखे वळण घेणार नाही याची काळजी आम्ही सदैव घेतो. म्हणजे प्रत्येकाचे दार बंद, शेजारी असून सुद्धा साधी ओळख,  बोलणे नाही ही तिकडची तऱ्हा आम्हाला मान्यच नाही. आम्ही सारे वारंवार एकत्र येत गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करतो. यामुळे करोनाचा धोका जास्त हे ठाऊक असूनही आमच्याकडून एकटे राहवले जात नाही. दिवसभरात एकदा तरी शेजाऱ्याकडे डोकवायचे. मदतीला धावून जायचे हीच खरी वैदर्भीय संस्कृती यावर आमची श्रद्धा. झालाच करोना तर सारे मिळून लढू असा धीर आम्ही एकमेकांना देत असतो. कितीही टाळेबंदी लादली तरी आम्ही वॉर्डातल्या बागेत असलेल्या देवळात हमखास भेटतोच. होते तिथे थोडीफार गर्दी पण त्याला काय करणार? देवापेक्षा कोणताही कायदा श्रेष्ठ नाही म्हणजे नाही. नियम हे पाळण्यासाठी असतात या तत्त्वावर आमचा फारसा विश्वास नाही. त्यामुळे मुखपट्टी जेव्हा आली तेव्हा नाक व तोंड मोकळे करून ती गळ्यात कशी अडकवायची हे आम्ही पहिले शिकून घेतले. नंतर आमचे अनुकरण साऱ्या राज्याने केले. सॅनिटायझर आमच्या खिशातच असते हो, पण ते बाहेर काढायला आम्ही अनेकदा विसरतो.

आम्ही वैदर्भीय लोक जरा अघळपघळ आहोत. यार दोस्तीला महत्त्व देणारे. त्यामुळे ओळखीचा कुणी भेटला की कडाडून मिठी मारणे, ते जमले नाहीच तर हात मिळवणे हे आमच्याकडून आपसूकच घडते. आता काहीजण म्हणतात की यामुळे करोनाचा प्रसार वेगाने होतो. होऊ दे की! ते ढोपराला ढोपर लावणे आम्हाला अजिबात मान्य नाही. काम असो वा नसो, दिवसातून एकदा तरी घराबाहेर पडलेच पाहिजे याकडे आमचा कटाक्ष असतो. त्याशिवाय आम्हाला अन्नच गोड लागत नाही. टाळेबंदीच्या काळात सुद्धा घरूनच भरलेली पिशवी घेऊन आम्ही निघायचो व काहीही खरेदी न करता परत यायचो. तेव्हा कुठे जरा बरे वाटायचे. आमच्या मुलांना सुद्धा आम्ही तशाच सवयी लावलेल्या. तेही त्यांच्या वाहनाने गाव व शहरभर हुंदडत असतात. ते करोनाला अजिबात भीत नाहीत. वडील लाखाची दुचाकी घेऊन देऊ शकतात तर उपचार सुद्धा करू शकतात याची त्यांना खात्री आहे. प्रसंगी त्यांना पोलिसांचे दंडे खावे लागतात. तरीही त्यांची फिरण्याची सवय जात नाही. काय करणार तेही वडीलधाऱ्यांसारखेच वागणार ना! मुलांनी मार खाल्ला की आमचा जीव कळवळतो तरीही बाहेर जाऊ नको असे आम्ही त्याला अजिबात सांगत नाही, उलट खुष्कीचे काही मार्ग दाखवतो. शेवटी मुलेच ती, घरात राहून डोक्याला ताप देण्यापेक्षा बाहेर गेलेली बरी! आता करोनावरची लस आल्याचे आम्हाला समजले आहे. मात्र ती घेण्याची घाई आम्हाला नाही. त्यासाठी गर्दी व झुंबड करणे, रेटारेटी करणे आमच्या स्वभावातच नाही. सारे कसे शांतपणे, रमतगमत, कसलीही वेळ न पाळता करायचे हाच आमचा स्वभाव. काही लोक याला आळशीपणा, तर काही थंडपणाची उपमा देतात मात्र त्याची फिकीर आम्हाला नाही. नियम तोडण्यात तत्पर असलेले आम्ही आळशी कसे राहू शकतो. तुम्हीच सांगा!

अठराव्या शतकात प्लेगने साऱ्या राज्यात थैमान घातले होते. नंतरच्या शतकात सुद्धा ही साथ आली. आम्ही तेव्हाही त्याचा मुकाबला केलाच की, कोणतेही नियम न पाळता. त्यामुळे फारशी धावपळ न करता अशा प्रत्येक साथीला पळवून लावण्याचे कसब आमच्या अंगी वंशपरंपरेने आलेले. त्यामुळेच आम्ही करोनाची फारशी काळजी करत नाही. हो, ते थाळीवादन, दिवे लावणे या गोष्टी आम्ही मनापासून करतो कारण ते करताना पुन्हा आमच्यातला सामाजिक प्राणी जागृत होतो ना! कोणत्या का निमित्ताने होईना एकत्र येणे, गप्पांचे फड रंगवणे, गर्दीचा भाग होणे, आम्हाला आवडते. सुख असो वा दु:ख, एकमेकांसोबत वाटून खायची आम्हाला सवयच. बंधनात जगणे आम्हाला आवडत नाही.

खूप वर्षांपूर्वी युद्ध झाले तेव्हा ‘ब्लॅकआऊट’ असायचा. तेव्हाही आम्ही खिडक्या उघडून आकाशाकडे बघायचोच. नियम तोडणे हे आमच्या रक्तातच आहे, मग प्रसंग कोणताही असो. आमच्या अशा वागण्याने दुसऱ्यांदा टाळेबंदीची वेळ आली. करोनाचा प्रसार वाढला हे खरे असले तरी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेही खरेच ना!

devendra.gawande@expressindia.com