|| लोकजागर : देवेंद्र गावंडे

आधीच इथले लोक गरीब, त्यातील बहुसंख्यांचे वार्षिक उत्पन्नच दोन ते चार हजारांच्या घरात. पारंपरिक शेती हाच त्यांचा वर्षांनुवर्षे सुरू असलेला व्यवसाय. हा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असला तरी नक्षलवादाची गडद छाया त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पसरलेली. त्यामुळे दहशतीत जगणे कायम पाचवीला पुजलेले. अशात यंदा पावसाने जोरदार तडाखा दिल्याने हा परिसर शब्दश: कफल्लक होऊन गेला आहे. ही गोष्ट आहे राज्यातील सर्वात मागास तालुका असलेल्या भामरागडची! एक महिन्याच्या अंतरात या तालुक्याला पुराने सातव्यांदा तडाखा दिला. यात शेकडो लोक अडकले. अनेकांची घरे, गुरेढोरे वाहून गेली. भामरागडची बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तेथील लहान-मोठे व्यापारी अक्षरश: रस्त्यावर आले. शेकडो आदिवासी बेघर झाले. अनेकांच्या घरातील साठवलेले तांदूळच वाहून गेले. यापैकी किती बातम्या आपल्या नागरी जीवनापर्यंत पोहचल्या? तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील पूर ओसरून आता महिना झाला, पण त्याचे कवित्व कायम आहे. अजूनही माध्यमात या पुराची भयावहता दाखवणाऱ्या बातम्या येत आहेत. पुराच्या वेळी मदतीसाठी धावून गेलेल्या लोकांचे, संस्थांचे कौतुक व सत्कार सोहळे होत आहेत. भामरागडच्या पुराची अशी दखल घेतली गेली नाही.

सांगली, कोल्हापूरच्या साथीने जेव्हा पहिल्यांदा भामरागडला पुराने वेढले तेव्हा हा मागास भाग काही काळ राज्यात चर्चेचा विषय झाला, नंतर राज्याचा समृद्ध असा, पश्चिम भाग तेवढा चर्चेत राहिला व भामरागड माध्यमाच्या नकाशावरून हळूच लुप्त झाले. नंतरच्या काळात पश्चिम भागातील पुराच्या हानीची चर्चा तेवढी होत राहिली, पण भामरागडला बसलेला हादरा बहुसंख्य विसरून गेले. तेथील हानीची चर्चा सुद्धा झाली नाही. पुराच्या तडाख्यात सापडलेल्या माणसांचे प्राण कुणी वाचवले? कोण मदतीला धावून गेले? पूरग्रस्तांना खाऊपिऊ कुणी घातले? यासारख्या प्रश्नावर विचार करावा असे उर्वरित राज्याला सोडाच, पण विदर्भाला सुद्धा वाटले नाही. मोठय़ाने नेहमी लहानाकडे लक्ष द्यावे ही आपली संस्कृती. तीच आपण विसरून गेलो. तिकडे निसर्गाने सुद्धा या भागावर सातत्याने अवकृपा करण्याचे यंदा जणू ठरवले होते. नंतरच्या काळात सहादा भामरागड व आजूबाजूच्या शंभर गावांना पुराचा तडाखा बसला. या भागातून वाहणाऱ्या पर्लकोटा, पामूलगौतम व इंद्रावती या तीन मोठय़ा नद्यांनी यंदा त्यांच्या सान्निध्यात वर्षांनुवर्षे जीवन जगणाऱ्या नागरिकांची सलग सातदा सत्वपरीक्षा घेतली. माणूस इतर कोणत्याही परीक्षेला सहज सामोरा जाऊ शकतो, पण निसर्गाच्या नाही. ठराविक अंतराने आलेल्या या पुरामुळे आधीच गरीब असलेल्या या भागाची अवस्था होत्याची नव्हती होऊन गेली. या काळात भामरागडशी सर्वाचा संपर्क तोडणारा पर्लकोटावरचा पूल तेवढा अनेकांच्या लक्षात राहिला. त्याची छायाचित्रे माध्यमावर झळकत राहिली. मात्र या पुराने भामरागडच्या आजूबाजूच्या दुर्गम भागात प्रचंड नुकसान पोहचवले. त्याची माहिती ना समोर आली वा ती आणण्याचा फारसा प्रयत्न कुणी केला नाही.

एखाद्या अन्यायाची दखल घेताना तो कुणावर झालाय, यावर त्याला किती महत्त्व द्यायचे हे ठरत असते. हीच आजकालची रीत झाली आहे. या प्रवृत्तीमुळे नेहमी उपेक्षित व गरिबांवर अन्याय होत असतो. तसा तो भामरागड व त्या भागात राहणाऱ्या अदिवासींवर आपण केला आहे. निसर्गाने केलेल्या या अन्यायाची दखलच मुळी कमी घेतली गेल्याने या भागातील हानीचे रौद्र रूप सर्वासमोर येऊ शकले नाही. भामरागडचा आठवडी बाजार हा या भागातील हजारो आदिवासींचा मोठा आधार. त्यावर बहुसंख्यांच्या घरातील चुलीचे पेटणे अवलंबून! पुराच्या काळात महिनाभर हा बाजारच भरला नाही. सहा व सात सप्टेंबरचा शेवटचा महापूर ओसरल्यावर तो भरला, पण त्यात कुणी सहभागीच झाले नाही. बाहेरून आलेले व्यापारी दिवसभर बसून राहिले. या पुराने या भागातील प्रत्येकाची क्रयशक्तीच गमावली. मग विकत तरी काय घेणार? जंगलाच्या कडेला लागून असलेली थोडीफार भाताची शेती करायची. त्यावर वर्षभर गुजराण करायची हाच येथील आदिवासींचा शिरस्ता. या पुराने तो पार मोडून काढला. शेकडो शेतकऱ्यांचे भाताचे पीक या महापुराने नष्ट करून टाकले. त्यामुळे आता जगायचे कसे, हा त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे. दुर्दैवाने संघटित नसलेल्या या आदिवासींचा आवाज अजून तरी राज्यभर घुमलेला नाही.

स्वत:वर झालेला अन्याय सुद्धा त्यांना नीट सांगता येत नाही. नागरी जीवनापासून दूर असलेला हा आदिवासी या भागात फिरणाऱ्या प्रत्येक बाहेरच्या माणसाकडे परक्या नजरेने बघतो. नक्षलींमुळे भीतीची छाया त्याच्या मनात सतत दडून बसलेली असते. यामुळे त्यांची दु:खेच समोर येत नाहीत. अशा साऱ्या प्रतिकूल स्थितीत या भागाला यावेळी खऱ्या अर्थाने दिलासा दिला तो गडचिरोली प्रशासनाने! भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, जिल्हाधिकारी शेखरसिंग, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आपत्ती निवारण यंत्रणेचे प्रमुख कृष्णा रेड्डी व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी पुराच्या काळात एकही जीवितहानी होऊ दिली नाही. निसर्गाच्या या प्रकोपात अडकलेल्या प्रत्येकाला सुखरूप कसे बाहेर काढता येईल, याची काळजी या साऱ्यांनी घेतली. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर शेवटचा म्हणजे सातवा पूर ओसरताच प्रशासनाने शंभर कर्मचाऱ्यांची एक तुकडीच भामरागडला रवाना केली. तिथे राहायला जागा नसल्याने हे सारे हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पात थांबले. नंतरचे सलग आठ दिवस या तुकडीतील प्रत्येकाने तालुक्यातील प्रत्येक गाव व शेतीचे शिवार बघितले. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या सक्रियतेमुळे भामरागडमध्ये हे प्रथमच घडले. पुरामुळे या भागातील अनेक शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या साफसफाई व दुरुस्तीसाठी लोकबिरादरीतील शाळकरी मुलांनी पुढाकार घेतला. मुख्य माध्यमांनी या पुराकडे फारसे लक्ष दिले नाही, पण समाजमाध्यमावर या पुराची बरीच चर्चा झाली. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संघटनांनी उत्स्फूर्तपणे मदत गोळा केली व ती भामरागडला पाठवली. आता त्याचेही वाटप सुरू आहे. १९९४ ला या भागात असाच महापूर आला होता. तेव्हाही सारे उद्ध्वस्त झाले होते. आता पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. यावेळी प्रशासन तसेच या भागातील लोकांनी एकमेकांच्या मदतीने या निसर्गाच्या तडाख्याचा सामना केला. आता ही पुराची जखम हळूहळू भरत येईल सुद्धा पण भामरागडच्या मागासलेपणाचे काय? ते कधी दूर होणार? नेहमी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यापासून सामान्यांचे रक्षण कसे होणार? येथे विकास कधी पोहचणार? यासारखे प्रश्न पुन्हा उभे करून हा पूर निघून गेला आहे. –             devendra.gawande@expressindia.com