देवेंद्र गावंडे

पराभवातून धडा घेईल ती काँग्रेस कसली? असा प्रश्न ज्याने कुणी सर्वात आधी उपस्थित केला असेल, त्याच्या दूरदृष्टीचे कौतुक करायला हवे. २०१४ पासून हाच प्रश्न प्रत्येक पराभवानंतर या पक्षाला माध्यमांकडून विचारला जात आहे. त्याचे उत्तर देणे तर सोडाच, पण त्या प्रश्नातील खोच लक्षात घेऊन त्यापासून साधा बोध घ्यायला सुद्धा या पक्षाचे नेते तयार नाहीत, याचा वारंवार प्रत्यय येतो आहे. विदर्भ हा तसा काँग्रेसचा एकेकाळचा गड. देशपातळीवर जेव्हा जेव्हा हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा विदर्भाने त्याला साथ दिली असा इतिहास. तो पुसून टाकण्याची भव्य कामगिरी भाजपने गेल्या पाच वर्षांत जवळजवळ सर्व निवडणुका एकहाती जिंकून केली. त्यामुळे आता भविष्यात या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, याविषयी अनेकांच्या मनात शंकाच जास्त आहेत. त्याला कारण विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत. यापैकी बहुतेकांनी आधीच्या पराभवातून अजिबात धडा घेतला नाही. त्याचे प्रत्यंतर वारंवार येते.

आता हे ताजे उदाहरण बघा. नुकतेच पक्षाचे कार्याध्यक्ष झालेले नितीन राऊत दिल्लीत श्रेष्ठींना भेटले. नागपुरातून लढणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध तगडा उमेदवार हवा म्हणून त्यांनी विलास मुत्तेमवारांचे नाव सुचवले. नंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी सारवासारव केली, पण तगडा उमेदवार संकल्पतेचे समर्थन करत मुत्तेमवारांसोबत मुकुल वासनिक, राजेंद्र मुळक यांची नावे घेतली. राऊतांची ही खेळी म्हणजे निव्वळ राजकारण आहे. असे पत्ते फेकून पक्षातील विरोधकांना जाळ्यात अडकवणे, त्यांची पंचाईत करणे हा खेळ या पक्षातील नेते कायम खेळत असतात. पक्षाची संघटनात्मक शक्ती बळकट असताना असे खेळ खपून जायचे. आजची स्थिती तशी नाही. या पक्षाच्या पायाखालची जमीन कधीचीच सरकलेली आहे. अशावेळी प्रत्येक जागा कशी जिंकता येईल? त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन नियोजन कसे करता येईल? कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी काय करता येईल? यासारख्या प्रश्नांना भिडण्याची तयारी अजूनही या पक्षातील वैदर्भीय नेते दाखवायला तयार नाहीत. उलट इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना एकमेकांचा काटा काढण्याचे राजकारण सुचते. स्वत:च्या मुलासाठी आग्रही असणाऱ्या मुत्तेमवारांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ अडकवायची. रामटेकमध्ये आडवे आलेल्या व पक्षाचे सरचिटणीस असलेल्या वासनिकांना अप्रत्यक्षपणे लढ म्हणायचे. ग्रामीण भागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुळकांना शहरात लढा, असे सुचवायचे हे सारे राजकारण आहे आणि ते काँग्रेसमध्ये सध्या जोमात सुरू झाले आहे.

या पक्षाचे प्रदेश पातळीवरचे नेतृत्व बदलून आता महिना होत आला. अद्याप थोरातांना विदर्भात यायला वेळ मिळालेला नाही. निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत व पक्षाच्या पातळीवर विदर्भात कमालीची शांतता आहे. कुठेही विभाग वा जिल्हावार मेळावे होत नाहीत. आधीच क्षीण झालेली संघटनात्मक बांधणी मजबूत करू, असे एकाही नेत्याला वाटत नाही. तसे प्रयत्न करताना सुद्धा कुणी दिसत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने उत्साह संचारलेले विजय वडेट्टीवार तेवढे फिरताना दिसतात. मात्र नियोजन करून संपूर्ण विदर्भात कार्यक्रमाची आखणी करावी असे कुणालाही वाटत नाही. नितीन राऊत व अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना कार्याध्यक्षपद दिले गेले. थोरात येत नसतील तर आपणच फिरू, असे या दोघांपैकी एकालाही वाटत नाही. दुसरीकडे भाजपचा प्रचार केव्हाचाच सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा येऊन गेली. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी अनेक उद्घाटने व भूमिपूजनाचा सपाटा सुरू केला आहे. भाजपच्या प्रचारातून काँग्रेसवर कठोर टीका केली जाते. त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडायला सुद्धा काँग्रेसचे नेते तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवून विरोध करा, असे आदेश पक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वाने दिले पण अनेकांनी ते पाळलेच नाहीत. ही यात्रा खुद्द कार्याध्यक्ष यशोमती ठाकूरांच्या मतदारसंघातून सुरू झाली, पण त्यांनी विरोध करण्याचे धाडस दाखवले नाही. याच ठाकूर तिकडे मुंबईत कर्नाटकाच्या आमदाराला भेटू दिले नाही म्हणून आकांडतांडव करताना दिसल्या.

राष्ट्रीय पातळीवर चमकेल अशी कृती करायची व राज्यपातळीवर स्वत:च्या मतदारसंघात मात्र चुप्पी साधायची हे असले राजकारण या पक्षाला सुस्थितीत घेऊन जाणार का? वृद्ध नेत्यांना, पराभूतांना संधी देऊ नका, नेत्यांच्या पुत्रांना उमेदवारी देऊ नका अशी विनंती तळागाळातील कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. त्याकडे साफ दुर्लक्ष करून नेते पराभूतांची नावे समोर करतात. काहीजण आपलाच मुलगा कसा श्रेष्ठ, हे श्रेष्ठींना पटवून देत आहेत तर काही सध्या आमदार असलेल्यांना पाडायचे कसे, याचे डावपेच आखण्यात व्यस्त आहेत. यासाठी या नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सध्या जोरात सुरू आहेत. निवडून येऊ की नाही, हा विचार यापैकी कुणाच्याही मनात नाही. उमेदवारी मिळवली की झाले, मग पडलो तरी दावा कायम हाच स्वार्थी विचार बहुतेकांच्या मनात आहे. यावर ताण म्हणजे विदर्भातील व राज्यातील एकमेव खासदार बाळा धानोरकर यांनी भद्रावतीतून पत्नीसाठी उमेदवारीचा आग्रह धरला आहे. सध्याचे वातावरण काय? पक्षाची जमिनीवरील अवस्था काय? संघटनात्मक शक्ती किती? मतदारांचा मूड काय? यासारख्या मूलभूत प्रश्नांपासून हे नेते कोसो दूर असल्याचे हे लक्षण आहे. पक्षाचे नेते एकीकडे असे स्वमग्न व स्वार्थी मनोवृत्तीत जगत असताना दुसरीकडे भाजप व सेनेने काँग्रेसमधील जेवढे प्रभावशाली स्थानिक नेते गळाला लावता येईल तेवढे जवळ करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक विद्यमान आमदारांना, स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना पक्षात घेतले जात आहे. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर पक्षाला बरे दिवस आणण्याची जबाबदारी आहे, ते मूकपणे हा खेळ बघत आहेत. जिंकण्यासाठी प्रेरणा देणारी विजिगीषू वृत्ती संपलेले हे नेते आहेत. अशा स्थितीत काँग्रेसचा निभाव कसा लागणार?

या पक्षात सुद्धा अनेक नवे चेहरे आहेत. त्यांना संधी द्यावी, आपण मागे राहावे असे पक्षातील एकाही नेत्याला वाटत नाही. नव्या चेहऱ्याला संधी द्या, असे म्हणणारा नेता हमखास त्याच्या मुलाचे नाव समोर करतो असेच सध्याचे चित्र आहे. विदर्भात भाजपचे बूथपातळीवरील नियोजन पूर्ण होत आले आहे. ठिकठिकाणची सर्वेक्षणे

आटोपली आहेत. कोण विजयी होऊ शकतो, याचा अंदाज घेत उमेदवार ठरवणे सुरू झाले आहे. काँग्रेसमध्ये यापैकी एकाही मुद्यावर साधी हालचाल नाही. कोणती जागा कशी जिंकता येईल, कुणाला उमेदवारी दिली तर फायद्याचे ठरेल, यासारख्या डावपेचात्मक विचारांपासून या पक्षाचे वैदर्भीय नेते सध्यातरी कोसो दूर आहेत.