देवेंद्र गावंडे  devendra.gawande@expressindia.com

निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच विदर्भात आलेले शरद पवार जिथे थांबले होते, त्या हॉटेलच्या समोरचे आवार गर्दीने फुलून गेले होते. तिथे जमलेल्या प्रत्येकाला पवारांना बघायचे किंवा भेटायचे होते. या गर्दीत केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते नव्हते तर धर्मनिरपेक्ष तत्त्वाला मानणाऱ्या प्रत्येक पक्षाचे लोक होते. विदर्भातील काही नेते राजकारणात होकायंत्रे म्हणून ओळखली जातात. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे त्यांचे वागणे बदलत असते. तेही पवारांची भेट घेण्यात आघाडीवर होते. एरव्ही पवार विदर्भात आले की राष्ट्रवादीच्या गराडय़ात असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांना सुद्धा ते आवर्जून भेटतात. आजवर त्यांच्या दौऱ्यात काँग्रेसचे नेते कधी दिसायचे नाहीत. यावेळी हे नेते सुद्धा पवारांना भेटण्यासाठी व्याकूळ दिसले. नितीन राऊत हे पवारविरोधी म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी तर चक्क पवारांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केला. तिथे आणखी बरेच नेते, दलित विचारवंत जमले होते. एकूणच पवारांची जादू सर्वावर कशी परिणाम करणारी आहे याचेच दर्शन या दौऱ्यात झाले. हे सारे घडले ते निवडणुकीच्या निकालामुळे.

संपूर्ण राज्यात आघाडीच्या प्रचाराची धुरा अप्रत्यक्षपणे पवारांच्याच खांद्यावर होती. त्यांच्यामुळेच युतीला मोठा झटका बसला. त्यांच्या या यशाचे संपूर्ण राज्यात कौतुक होत असताना विदर्भही मागे राहिला नाही हे महत्त्वाचे! तसे बघितले तर पवार प्रचाराच्या काळात विदर्भात एकदाच आले. त्यांच्या पक्षाचे केवळ १२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ६ जिंकले. पवारांनी जिथे सभा घेतल्या तिथले बहुतांश उमेदवार हरले सुद्धा! पण त्यांनी आघाडीपासून दूर गेलेल्या मतदारांना परत आणण्यात बऱ्यापैकी यश मिळवले हे सत्य आहे. त्यामुळे ते या दौऱ्यात अगदी राज्यकर्त्यांच्या थाटात वावरले. शेतकऱ्यांना दिलासा दिला. संत्री उत्पादकांसाठी थेट चीनला फोन लावला. मिहानमध्ये जाऊन तेथील प्रगतीचा आढावा घेतला. किती उद्योग आले, किती यायचे राहिले याची माहिती जाणून घेतली. मिहानचे अधिकारी सुद्धा पवारांना तत्परतेने माहिती देत असल्याचे, कागदपत्रे दाखवत असल्याचे चित्र आघाडीला सुखावणारे होते. विरोधी पक्षातील नेते प्रशासनापासून दूर असतात. सत्ताधाऱ्यांवर टीका हेच त्यांचे लक्ष्य असते. पवार तसे वागले नाहीत. त्यांनी समस्यांचा आढावा घेतानाच त्या मार्गी कशा लागतील, यासाठी प्रयत्न केले. यशामुळे हुरूप आलेल्या पवारांचे हे नवे रूप अनेक पराभूतांच्या मनांना उभारी देणारे ठरले.

या साऱ्या सुखावणाऱ्या पाश्र्वभूमीवर विदर्भात राष्ट्रवादी वाढत का नाही, हा प्रश्न शिल्लक राहतोच. या पक्षाच्या स्थापनेला आता दोन दशके झाली. तरीही त्याची विदर्भातील ताकद नगण्य म्हणावी अशीच आहे. नेहमी काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादीला विदर्भात जास्त जागा लढवता आल्या नाही, हे खरे असले तरी पक्षाची ताकद वाढवून जागांमध्ये वाढ करवून घेण्याचा पर्याय या पक्षासमोर होता. त्यात पवार यशस्वी ठरले नाहीत. हेच पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा विदर्भात त्यांची जादू चालायची. १९९८च्या निवडणुकीत विदर्भात पैकीच्या पैकी खासदार निवडून आणण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे व अजून तो कुणाला मोडता आला नाही. त्यांनी नवा पक्ष स्थापन केल्याबरोबर मात्र विदर्भ त्यांच्यापासून दूर गेला. त्याची कारणे अनेक आहेत. पवारांनी त्यावर मंथनही केले असेल, पण उपाय योजण्यात ते कमी पडले. राष्ट्रवादी हा मराठय़ांचा रिपब्लिकन पक्ष म्हणून चर्चिला जातो. विदर्भात मराठय़ांचे प्राबल्य फारसे नाही. दलित, आदिवासी, ओबीसी हाच मतदार काँग्रेसविचारी पक्षांचा आधार राहिला आहे. पक्षातील मराठय़ांच्या वर्चस्वामुळे हा वर्ग राष्ट्रवादीशी जुळू शकला नाही. नवा पक्ष स्थापताना राज्यातील अनेक बडे नेते पवारांसोबत गेले तसे मोठे पक्षांतर विदर्भात घडले नाही. देशमुख, पटेल व नाईक ही तीन राजकीय घराणी वगळता पवारांचा हात कुणी धरला नाही. पक्ष वाढवायचा असेल तर या तीन घराण्याच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल, याची जाणीव पवारांना अनेकदा झाली असेल, पण त्यादृष्टीने पक्षाची पावले कधी पडताना दिसली नाही.

विदर्भातील दलित व आदिवासींना जवळ करण्यासाठी या पक्षाने ठरवून एखादे नेतृत्व पुढे आणले नाही. निवडणुकीच्या राजकारणात पक्षाला जेव्हा सातत्याने अपयश येते तेव्हा नवनवे प्रयोग करावे लागतात. ते कधी राष्ट्रवादीने विदर्भात केले नाहीत. राष्ट्रवादीचाच सहकारी असलेल्या काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची कोंडी या काळात झाली. पण त्यांनी राष्ट्रवादीऐवजी भाजपचा पर्याय स्वीकारला. याचाच अर्थ पवारांचा पक्ष विदर्भात विश्वासार्हता निर्माण करण्यात कमी पडला. राष्ट्रवादी जेव्हा राज्यात सत्तेत होता तेव्हाही या पक्षाने विदर्भाच्या प्रश्नांना कधी प्राधान्य दिल्याचे दिसले नाही. काँग्रेसने विदर्भाच्या प्रश्नाचा विचार करायचा व राष्ट्रवादीने उर्वरित राज्याचा, असेच चित्र दीर्घकाळ राहिले. विशेष म्हणजे, सेना सुद्धा याच मार्गाने जाताना दिसली. त्यामुळे सेना व राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा समज अधिकाधिक दृढ होत गेला.आता पवार ज्या मिहानमध्ये गेले तो प्रकल्प त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात उभारी घेऊ शकला नाही. याचा अर्थ आता खूप बदल झाला असा नाही. पण अशा अनेक मुद्यांमुळे जनतेचे मन आघाडीविरोधी होत गेले व त्याची झळ राष्ट्रवादीलाही सहन करावी लागली.

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर पवारांनी नेहमी तळ्यातमळ्यात भूमिका घेतली. आज हा मुद्दा कालबाह्य़ झाला आहे हे खरे पण जेव्हा धुमसत होता तेव्हा ठोस भूमिका घेण्याचे पवारांनी टाळले. वाटय़ाचा निधी व मंजूर विकास प्रकल्प पळवणारा पक्ष अशी राष्ट्रवादीची प्रतिमा गेल्या वीस वर्षांत विदर्भात निर्माण झाली. यात खरे किती व खोटे किती, हा वादाचा मुद्दा असला तरी पक्षाची अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेस व भाजप आघाडीवर होते. त्याचा जोरदार प्रतिवाद राष्ट्रवादीला कधी करता आला नाही. हा मुद्दा कुणी काढलाच तर विदर्भाला आळशी ठरवण्याकडेच या पक्षाचा कल राहिला. तरीही राष्ट्रवादीचे नेते विदर्भात पाळेमुळे रुजावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले हे मात्र खरे! भाजप सरकारच्या विरोधातील पहिली यात्रा राष्ट्रवादीने विदर्भातूनच काढली. या प्रयत्नांच्या जोडीला विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादीने कधी केले नाही. त्यामुळे विदर्भाचा विचार शेवटी करणारा पक्ष अशीच त्याची ओळख राहिली. ती बदलायची असेल तर जोशात आलेल्या पवारांना विदर्भाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतरी सारे विसरून वैदर्भीय त्यांच्यावर कसे प्रेम करतात, हे त्यांनी नुकतेच अनुभवले आहेच!