‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे आवाहन; जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले गुंतवणुकीचे पर्याय

नागपूर : महागाईच्या काळात बचतीचे जेवढे महत्त्व आहे, तेवढीच गुंतवणूक आवश्यक आहे. भविष्यातील वाढत जाणारे खर्च आणि महागाईचा वाढता आलेख पाहता बचत व गुंतवणूक या दोन्हीचा सुवर्णमध्य साधणे  गरजेचे आहे. त्यासाठी आधी आर्थिक साक्षर व्हा, असे आवाहन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या कार्यक्रमात तज्ज्ञांनी केले.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियन म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात ‘बचतीसाठी गुंतवणूक कशी करायची’ यावर गौरव जाजू यांनी तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर प्रशांत चौबळ यांनी मार्गदर्शन केले.    व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा माहिती अधिकारी रवि गीते, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, उपजिल्हाधिकारी (गोसीखुर्द) अविनाश कातडे, लोकसत्ताचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे उपस्थित होते.

नवीन करप्रणाली ही वस्तुत: सरकारी कर्मचारी आणि काही वर्षांपासून जे नोकरी करत आहेत, त्यांच्यासाठी विशेष फायदेशीर नाही. ज्यामुळे कराचा भरणा जुन्याच पद्धतीने होणे योग्य आहे. नवीन करप्रणालीत कर कमी असला तरीही त्यात विशेष फायदा नाही, असे प्रशांत चौबळ यांनी सांगितले. कर वाचवण्यासाठी आपण कुठेही गुंतवणूक करतो. त्यासाठी चुकीची प्रणाली निवडतो. नेमके येथेच आपली फसगत होते. महागाईमुळे शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च वाढत आहेत. दुसरीकडे बँकांमधील बचत आणि मुदत ठेव यावरील व्याजाचे दर कमी होत आहेत.   केवळ बचतीवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. त्यासाठी गुंतवणूक ही बचतीचा पुढचा टप्पा आहे, असे प्रशांत चौबळ यांनी सांगितले. माणूस बचत करतो, पण केलेली बचत वस्तूंच्या खरेदीवर खर्च करतो. अशावेळी त्या बचतीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे बचतीसाठी गुंतवणूक करा, असा सल्ला गौरव जाजू यांनी दिला. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करायची, हे जाजू यांनी सांगितले. मालमत्ता खरेदीत पूर्ण गुंतवणूक करून चालणार नाही, कारण मालमत्ता जेव्हा विक्रीला काढली जाते, तेव्हा त्याची अधिक किंमत तर दूरच, पूर्ण किंमत मिळेल की नाही याची शाश्वती नसते.

सोने ही गुंतवणूक आहे आणि गेल्या एक वर्षांत त्याचा चांगला परतावा मिळाला आहे. मात्र, ती एक वस्तू असल्यामुळे चोरीला जाण्याची शक्यता आहे. सोन्यात गुंतवणूक करायचीच असेल तर ‘गोल्ड ईटीएफ’ (गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड्स) मध्ये करा. हे इंडेक्स म्युच्युअल फंडासारखेच आहे. सोन्याच्या किंमतीवर आधारित आणि सराफा बाजारात ‘गोल्ड ईटीएफ’ केले जाते. सोने विकत घेण्यापेक्षा याचा खर्च अतिशय कमी असून पूर्णपणे पारदर्शक आहे, असे जाजू यांनी सांगितले. भविष्यातील वाटचालीकरिता बचतीच्या जोडीला गुंतवणूक आणि त्याच्या जोडीला आरोग्य विमा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाला विशेष भूसंपादन अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार(शहर) सूर्यकांत पाटील, वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे,  राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनील वालावलकर यांनी केले.

तज्ज्ञांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

* बाहेर देशात राहणाऱ्यांनी नॉमिनी वेळोवेळी अद्ययावत करत रहावे.

* मुदत ठेवी ठेवताना  केवळ आपले खाते आहे, म्हणून बँकेची निवड करू नका.  चांगली राष्ट्रीयीकृत बँक निवडा.

* आधार आणि पॅन कार्डप्रमाणेच डिमॅट खाते आवश्यक असून ती आताच्या काळाची गरज आहे.

* बचतीला प्राधान्य देणाऱ्या पारंपरिक पद्धतीला गुंतवणुकीच्या अन्य पर्यायाची जोड द्या.

* मुदतीवरील व्याज हे उत्पन्न आहे आणि त्यावर कर लागू शकतो. त्यामुळे हे व्याज बचत खात्यात जमा करावे.

* गुंतवणूक ही कला आहे आणि त्यासाठी अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. हे एकदा जमले की भविष्यातील खर्चाची चिंता दूर होते.

आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन

‘आयसीआयसीआय प्रुडेंन्शियल म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम  विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी २६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात (पहिला माळा) होणार आहे. तो  नि:शुल्क आहे. यावेळी ‘समजदार गुंतवणुकीचे मर्म’ यावर गौरव जाजू तर ‘गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन’ या विषयावर प्रशांत चौबळ मार्गदर्शन करतील.  कार्यक्रमास विभागीय आयुक्त संजीवकुमार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.